

कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून खटल्याचा शनिवारी (दि. 5) पनवेल येथील सत्र न्यायालयात निकाल होणार आहे. सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. निकालाकडे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांसह राज्यातील पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.
सरकारच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सोमवारी ही माहिती दिली. खून खटल्यात मुख्य संशयित व बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने त्याच्या मीरा रोड येथील घरी अश्विनी बिद्रे-गोरे यांचा अमानुष खून केला होता, असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. खुनात कुरुंदकरने राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांची मदत घेतली होती. कुरुंदकरसह चारही आरोपी सात वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. खटल्यात सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. घरत यांची नियुक्ती केली आहे. तर, आरोपीच्या वतीने अॅड. विशाल भानुशाली, अॅड. प्रसाद पाटील कामकाज पाहत आहेत. अश्विनी बिद्रे-गोरे यांचा 11 एप्रिल 2016 मध्ये अभय कुरुंदकर याने खून केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर त्याने सहकार्यांच्या मदतीने अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या मृतदेहाचे करवतीने लहान-लहान तुकडे करून वसईच्या खाडीत फेकून दिले होते. 7 डिसेंबर 2017 मध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावर ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकरला या प्रकरणात अटक झाली. राजेश पाटील यास 10 डिसेंबर 2017 मध्ये जेरबंद केले. दोन्हीही आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांनी कुंदन भंडारी व महेश फळणीकरला अटक केली होती. अश्विनी बिद्रे-गोरे या सहायक पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत हात्या. हातकणंगले तालुक्यातील आळते हे त्यांचे मूळचे गाव. सामान्य घराण्यातून वरिष्ठ पोलिस पदाधिकारीपदावर पोहोचलेल्या अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या खुनाने जिल्हा हळहळला होता. खटल्याच्या निकालाकडे कोल्हापूर जिल्ह्यासह पोलिस दलाचे लक्ष लागले आहे.