कोल्हापूर : चित्रपटसृष्टीत अनेक लोक चांगली कामे करतात, पण मला जो मानसन्मान मिळाला, तो सगळ्यांनाच मिळत नाही. स्वतःला नशीबवान समजतो, कलाकार म्हणून रसिकांनी डोक्यावर घेतले. कोल्हापूरनेच मला घडवले म्हणून इथंवर पोहोचलो. अशी माणसं पुन्हा कधी भेटली नाहीत, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीने ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ अशोक सराफ यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, निवेदिता सराफ, आ. सतेज पाटील, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या उपस्थितीत शनिवारी प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
लोकांनी मला भरभरून दिलं. रसिकांनी डोक्यावर उचलून घेतलं नसतं, तर मी आज कुठेतरी नाटकाचा पडदा ओढत बसलो असतो, असे सांगून सराफ यांनी कोल्हापुरातल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ते भावुक झाले. सराफ म्हणाले, आयुष्यात कोल्हापूरसारखी माणसं मला कुठे भेटली नाहीत, ‘चला की राव जेवायला’ अशा आपुलकीने बोलावणारी माणसं कोल्हापूरशिवाय कुठे भेटणार नाहीत. मी अनेक वर्षे कोल्हापुरात राहिलो. इथल्या गल्लीबोळात फिरलो. माझ्या अनेक चित्रपटांचं शूटिंग इथं झालं. 1978 हे पूर्ण वर्ष मी कोल्हापुरात होतो. इथेच मला ‘मामा’ म्हणून बोलायला लागले.
कोल्हापुरातील रसिक दाद देणारा आहे. म्हणून कोल्हापुरात कला सादर करण्यासाठी प्रत्येक कलाकार उत्सुक असतो. त्यामुळे केशवराव भोसले नाट्यगृह लवकर सुरू व्हावे आणि मला इथे नाटकाचा प्रयोग करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मंत्री उदय सामंत म्हणाले, अशोक सराफ हे असे व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांच्या सत्कारासाठी राजकीय नेत्यांचे पक्षीय जोडे स्टेजच्या खालीच काढलेले असतात. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मराठी भाषेचे काही प्रश्न असतील तर अशोकमामांनी मला हक्काने सांगावेत.
दादा कोंडके, अशोक सराफ यांचे खळखळून हसवणारे चित्रपट पाहत आपण मोठे झालो. तसा मी भोळाभाबडा आहे. यापेक्षा जास्त काही बोलत नाही, असे मुश्रीफ म्हणताच आ. सतेज पाटील यांनी यावर आपण ‘भोळाभाबडा’ नावाचा चित्रपट काढू, अशी टीपणी करताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.