

कोल्हापूर : टाळ-मृदंगाचा गजर... ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष... भगव्या पताकांचा डौल... आणि हजारो भाविकांच्या साक्षीने रिंगणात दौडणारे अश्व... अशा भक्तिमय वातावरणात रविवारी पुईखडी पठारावर श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा पार पडला. पावसाच्या हलक्या सरी झेलत, विठुनामाच्या गजरात रंगलेल्या या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या नंदवाळ (ता. करवीर) येथील आषाढी वारीला कोल्हापुरात विशेष महत्त्व आहे. ज्यांना पंढरीच्या वारीला जाणे शक्य होत नाही, ते भाविक या दिंडीत मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. यंदा या दिंडीचे 25 वे रौप्यमहोत्सवी वर्ष होते. रविवारी सकाळी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून फुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथातून माऊलींच्या प्रतिमेसह पालखीने प्रस्थान केले. टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेले वारकरी आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांमुळे संपूर्ण पालखी मार्ग विठुमय झाला होता.
दुपारी पालखी पुईखडी पठारावर पोहोचताच सर्वांना रिंगणाची आस लागली. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, माजी आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, सत्यजित कदम, आदिल फरास, शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, कृष्णात धोत्रे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन झाले. यावेळी रथासाठी चांदी देणारे आ. राजेश क्षीरसागर, रथाची सजावट करणारे कारागीर, मानाच्या अश्वाचे मानकरी संतोष रांगोळे बंधू यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दिंडीप्रमुख लाड महाराज, महादेव महाराज यादव, बाळासाहेब पवार, भगवान तिवले यांच्यासह दिंडी संयोजक उपस्थित होते. यानंतर मानाच्या अश्वांनी रिंगणात दौड घेताच आसमंत विठ्ठल नामाने दुमदुमून गेला. अश्वांनी चार फेर्या पूर्ण करताच त्यांच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. हा भावपूर्ण क्षण अनुभवताना अनेकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.
रिंगणानंतर वारकर्यांनी फुगड्या, पावल्या, हुतूतू, काटवट कणा अशा पारंपरिक खेळांचा आनंद लुटला. दिंडी मार्गावर अनेक सामाजिक संस्थांनी वारकर्यांसाठी अल्पोपाहार व पाण्याची सोय केली होती. विशेष म्हणजे, सोहळ्यानंतर काही स्वयंसेवी संस्थांनी तातडीने स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला. यानंतर पालखीने नंदवाळच्या दिशेने प्रस्थान केले.
मानाचे अश्व रिंगणात दौड घेताच ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजराने आसमंत दुमदुमला. दोन्ही अश्वांनी चार फेर्या पूर्ण करताच रिंगणाच्या मध्यभागी असलेल्या पालखीच्या दिशेने प्रस्थान केले. त्या क्षणी अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. हे द़ृश्य पाहून अनेक वारकर्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
पालखी मार्गावर वारकर्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या. विठ्ठल रखुमाईच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. लहान मुले विठ्ठलाच्या वेशभूषेत या दिंडीत सहभागी झाली होती. राष्ट्रपती पुरस्कार विजेते कलाशिक्षक सागर बगाडे यांनी वारकर्याची वेशभूषा करून विठू-रखुमाईची मूर्ती डोक्यावर घेऊन लक्ष वेधून घेतले. अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी दिंडी मार्गावर खिचडी, सुगंधी दूध, केळी, लाडू, प्रसाद वाटप केले.
रिंगण सोहळ्यानंतर या परिसरात काही स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांनी स्वच्छता मोहीम राबवली. तसेच दिंडी मार्गातील कचराही स्वच्छ केला. गडकोट गिर्यारोहक संस्थेतर्फे भाविकांकडून टाकण्यात आलेला कचरा, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या स्वच्छ केल्या. यावेळी दहा पोती कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये अमोल पाटील, अभिजित पिल्ले, दीपक सुतार, गजानन गराडे, लीना जैनबागे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.