Ashadhi Ekadashi 2025 | लाखो भाविकांच्या उपस्थितीत बाळूमामांच्या बकऱ्यांच्या बग्ग्यात आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात
Admapur Balumama bagga yatra
मुदाळतिट्टा : महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, गोवा, कोकण तसेच कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या संत सदगुरू बाळूमामांच्या बग्ग्यात (बकऱ्यांच्या कळपात) आषाढी एकादशी विविध उपक्रमांनी धार्मिक वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. बाळूमामाच्या नावानं चांगभलं चा जयघोष... धनगरी ढोल वादन... भजन कीर्तन... महाप्रसादाने सांगता झाली. लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
संत सदगुरु बाळूमामांच्या बकऱ्यांचे १८ बग्गे (कळप) असून या बग्ग्यांमध्ये वालंग (ढोलवादन), बाळूमामांच्या जीवनावर आधारित ओवी गायन, भजन (हरिजागर), वालंग, गजनृत्य, कीर्तन, प्रवचन, रक्तदान शिबिर आदी कार्यक्रम झाले. आरती झाल्यानंतर पालखी सोहळ्यानंतर महाप्रसादाने सांगता झाली. महाराष्ट्रातील अठरा ठिकाणी बाळूमामांच्या बग्ग्यात आषाढी एकादशी उत्साहात झाली.
(बकरी बग्गा असलेले गाव व कंसात जिल्हा) -
सुभाषनगर- विंचूळ, लखमापूर रामवाडी (नाशिक), चिखलबीड, धनगरवाडी पिंपळा (बीड), मासाळवाडी,धानोल, निमगाव केतकी, पाटस, मलटन शिंदेवाडी (पुणे), फुलेनगर-विटा, नागेवाडी, अंकली (सांगली), लिंगापूर (बागलकोट), वाकवड (धाराशिव), डोंबळवाडी (अहिल्यानगर), पिनुर पाटकुल, सोनके, तिसंगी (सोलापूर) या ठिकाणी बकऱ्यांमध्ये झाली.
यावेळी बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, कार्याध्यक्ष लक्ष्मण होडगे, सदस्य, देवालयाचे पदाधिकारी आदींनी काही बग्ग्यांना भेटी दिल्या. या सर्व बग्ग्यांचे कारभारी गुंडोपंत पाटील, विष्णू गायकवाड, लहू गायके, बाळू शिणगारे, लकाप्पा दुरदुंडी, नागाप्पा मिरजे, पांडुरंग बंडगर, अनिल शिणगारे, आप्पा माळी, काशिनाथ शिणगारे, सुबराव लवटे, यशवंत सुराण्णवर, विशाल सिद्ध, हालाप्पा सुराण्णवर, राहुल वाघमोडे, बापू हातणुरकर, लहू लिंगरे, भिमाप्पा झलक तसेच प्रत्येक बग्ग्यात बकऱ्यांच्या सेवेसाठी असणारे मेंढके हजारो भाविक उपस्थित होते. महाप्रसादानंतर प्रत्येक बग्ग्यातून महाराष्ट्र तसेच कर्नाटक आदी राज्यातील भाविक रवाना झाले.
आषाढी एकादशी निमित्त आदमापुर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू संत बाळूमामा दोन दिवसांत हजारो भाविकांनी दर्शन घेतले. ग्रामीण भागातून वारकऱ्यांच्या दिंड्या आदमापूर येथे आल्या होत्या.

