

कोल्हापूर : गोकुळबाबत आमदार सतेज पाटील यांनी वल्गना करू नयेत. गोकुळच्या निवडणुकीत त्यांचा मोठ्या फरकाने पराभव होईल, असा टोला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी लगावला.
गोकुळची निवडणूक एकदा झालीच पाहिजे. मग शेतकरी कुणाच्या बाजूने आहेत, ते समजेल, असे वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी केले होते. याबाबत शेंडा पार्क येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व म्हणजे २५ उमेदवार विजयी होतील. आ. पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव होईल.
कोल्हापूर : गोकुळच्या प्रारूप मतदार यादीवर ५९५ हरकती सहायक निबंधक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. शुक्रवारी हरकत दाखल करण्याची मुदत संपली असून अखेरच्या दिवशी सुमारे ११५ हरकती दाखल झाल्या आहेत. सोमवारपासून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक देवीदास मिसाळ हरकतींवर सुनावणी घेणार आहेत.
गोकुळची निवडणुक प्रक्रिया सुरू असून १२ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यादीवर हरकत दाखल करण्यासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदत होती. सहायक निबंधक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या हरकतींमध्ये बहुतांश हरकती या मतदार यादीत समावेश करण्याबाबत, नावात बदल करण्यासंदर्भातील आहेत. प्राप्त हरकतींवर सोमवारपासून (दि. २४) सुनावणीस सुरुवात होत असून हरकतींवर विभागीय उपनिबंधक मिसाळ काय निर्णय घेणार, किती संस्था यादीतून बाहेर जाणार, किती संस्थांचा यादीत समावेश होणार, याकडे लक्ष असणार आहे.
सुनावणीस केवळ पाच दिवस मिळणार
सुनावणीसाठी तसा दहा दिवसांचा कालावधी आहे; मात्र या कालावधीत पाच सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे केवळ पाच दिवसांत दुग्ध विभागाला ५९५ हरकतींवर सुनावणी घेऊन त्यावर निर्णय द्यावा लागणार आहे. त्यामुळे अधिकार्यांचा कस लागणार आहे.