Financial fraud | ‘ग्रोबझ’ पाठोपाठ ए. एस. ट्रेडिंगमधील घोटाळ्याच्या तपासही संशयाच्या भोवर्‍यात

कोट्यवधी रुपयांच्या रकमांवर दरोडा
Financial fraud
Financial fraud | ‘ग्रोबझ’ पाठोपाठ ए. एस. ट्रेडिंगमधील घोटाळ्याच्या तपासही संशयाच्या भोवर्‍यात
Published on
Updated on

दिलीप भिसे

कोल्हापूर : ग्रोबझ ट्रेडिंग सर्व्हिसेसकडून 280 कोटींची फसवणूक झालेली असतानाही 12 कोटींची चार्जशीट का, असा रोखठोक प्रश्न उपस्थित करून न्यायालयाने तपास यंत्रणेला धारेवर धरल्याने ए. एस. ट्रेडिंगसह संलग्न कंपन्यांमधील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासाचा मुद्दा बहुचर्चित ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांत व्याप्ती असलेल्या ए. एस. ट्रेडर्समधील एक लाखापेक्षा जादा गुंतवणूकदारांची अडीच हजारांवर कोटींच्या फसवणुकीचा आकडा असतानाही तपासात 51 कोटींची फसवणूक उघड झाली आहे. केवळ 27 कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. गोरगरिबांच्या गुंतवणुकीवर डल्ला मारणार्‍यांची सखोल चौकशीची गरज आहे.

विशेष म्हणजे, ग्रोबझ ट्रेडिंग, ए. एस. ट्रेडर्ससह शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी किमान दोन डझनहून अधिक कंपन्यांच्या प्रमुखांसह संचालक, एजंटांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. एकाचवेळी अधिक संख्येने गुन्हे दाखल झाल्याने आणि काही ठरावीक तत्कालीन अधिकार्‍यांकडेच वरिष्ठांकडून तपासाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने फसवणुकीच्या एकाही गुन्ह्याचा शेवट झाला नाही की, गुंतवणूक केलेल्या मुद्दलाच्या मूळ रकमा गुंतवणूकदारांच्या हाताला लागल्या नाहीत. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशीच काहीशी तपासाची स्थिती झाली आहे.

दामदुप्पट परताव्याच्या आमिषाने महाराष्ट्र, कर्नाटकसह अन्य राज्यात व्याप्ती असलेल्या एक लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची अडीच हजारांवर कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ए. एस. ट्रेडर्स कंपनीचा सर्वेसर्वा तथा मॅनेजिंग डॉयरेक्टर लोहितसिंग सुभेदारसह 27 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. नोव्हेंबर 2022 पासून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. प्राथमिक टप्प्यात शाहूपुरी आणि त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे. ‘एलसीबी’चे तत्कालीन निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपासाला गती देत 19 जणांना जेरबंद करीत 27 कोटीच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

फसवणुकीचा तपास संशयास्पद; काहींना क्लिन चिट

‘ए.एस. ट्रेडर्स’च्या कोट्यवधीच्या फसवणुकीचा तपास प्रारंभापासून संशयास्पद ठरला आहे. काही अधिकार्‍यांच्या तडफाफडकी बदल्या झाल्या आहेत. काही अधिकार्‍यांकडून तपासाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. काही जणांची वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कानउघाडणीही झाली आहे. कंपनीच्या उलाढालीशी संबंधित असलेल्या काही मंडळींना क्लिनचिटही देण्यात आली आहे. बहुतांश वादग्रस्त एजंटांना तपास यंत्रणेतील काही घटकांची पाठराखण करण्यात आल्याचे दिसून येते.

चौकशीच्या रडारवरील प्रमुख 17 एजंट अजूनही गायब

कंपनीच्या आर्थिक उलाढालीशी संबंधित असलेल्या कोल्हापूर, इचलकरंजी, हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड, सांगली, मिरजेसह सीमाभागातील प्रमुख 17 एजंट तपास यंत्रणांच्या ‘रडार’वर आले होते. संशयितांची चौकशी करून त्यांच्यावर अटकेची कारवाई केली जाईल, असेही तत्कालीन अधिकार्‍यांनी स्पष्ट केले होते; मात्र संबंधित एजंटांवर आजअखेर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट उजळमाथ्याने त्यांचा वावर राहिला आहे. शाहूपुरीतील एका तत्कालीन अधिकार्‍यांच्या ‘सासरेबुवा’च्या मध्यस्थीने सारा मामला गुलदस्त्यात राहिला आहे. याचा भांडाफोड होण्याची गरज आहे.

ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्ससह संलग्न कंपन्यांतील घोटाळा : एक नजर!

26 नोव्हेंबर 2022 : मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदारसह 27 जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा

19 सप्टेंबर 2023 : म्होरक्या लोहितसिंग सुभेदार महामार्गावर जेरबंद

डिसेंबर 2023 : सुभेदारसह 17 संचालकांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

ए.एस. ट्रेडर्समध्ये गुंतवणूक केलेल्या 556 गुंतवणूकदारांची तक्रार

तपासात निष्पन्न फसवणुकीची निष्पन्न रक्कम : 51 कोटी

27 कोटी किंमतीच्या मालमत्तांवर टाच (सरकारी मूल्यांकनानुसार)

म्होरक्यासह संचालक, एजंटांसह साखळीतील 19 जणांना अटक

जामिनावर सुटका झालेले 6, फरार 16, अटकपूर्व जामीन मिळालेले 3

गुन्हे दाखल : कोल्हापूर (शाहूपुरी), नांदेड, लोणावळा, पुणे, उस्मानाबाद, नागपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news