

कोल्हापूर : कंपनीच्या म्होरक्यासह संचालक आणि एजंटांच्या गैरकारभारामुळे कोट्यवधीच्या घोटाळ्यात बुडालेल्या आणि तपासाच्या संशयास्पद कार्यपद्धतीमुळे वादाच्या भोवर्यात सापडलेल्या ए. एस. ट्रेडर्स डेव्हलपर्स अॅण्ड संलग्न कंपन्यांमधील कोट्यवधीच्या घोटाळ्याच्या चौकशीचा फेरआढावा घेण्यात येईल, असे पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी गुरुवारी स्पष्ट केले. गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक करणार्या दोषी एजंटांसह साखळीवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
‘ग्रोबझ’पाठोपाठ ए. एस. ट्रेडर्स आणि संलग्न कंपन्यांमधील अडीच हजार कोटींच्या घोटाळ्याच्या संशयास्पद तपास प्रक्रियेसंदर्भात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. ‘ग्रोबझ’ कंपनीतील घोटाळ्याच्या तपासाच्या कार्यपद्धतीवर कोल्हापूर सर्किट बेंचच्या न्यायमूर्तींनी तत्कालीन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडडित यांच्यासह तपास अधिकार्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. वरिष्ठ अधिकार्यांसह तपास अधिकार्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ए. एस. ट्रेडर्समधील कोट्यवधीचा घोटाळा आणि तपास अधिकार्यांच्या संशयास्पद कार्यपध्दतीबद्दल पत्रकारांनी पोलिस अधीक्षक गुप्ता यांचे लक्ष वेधले. यावर ते म्हणाले, ग्रोबझ, ए. एस. ट्रेडर्ससह आर्थिक घोटाळ्यांच्या तपासाचा वारंवार आढावा घेतला जातो. ग्रोबझ कंपनीसह ए. एस. ट्रेडर्समधील घोटाळ्याचा तपासाचा निश्चित फेरआढावा घेतला जाईल.
संबंधितांची सखोल चौकशी होईल
ए. एस. ट्रेडिंगसह संलग्न असलेल्या विविध कंपन्यांमधून 48 एजंटांवर 146 कोटींची खैरात होऊनही आणि दप्तरी कागदोपत्री रेकॉर्ड असताना केवळ बोटावर मोजण्याइतपत एजंटांना अटक झाली आहे. बहुतांशी एजंटांचा मोकाट वावर असल्याचे पत्रकारांनी पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर गुप्ता म्हणाले, परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या कंपन्यांसह संबिंधिधतांची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यात दोषी ठरलेल्यांवर कायदेशीर कारवाईचा निश्चित बडगा उगारण्यात येईल. शहरासह जिल्ह्यात दाखल आर्थिक गुन्ह्यांचा आणि झालेल्या कारवाईचा आपण लवकरच आढावा घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.