AS Traders Case | घोटाळा अडीच हजार कोटींचा; ५४ कोटी निष्पन्न

अवघे २२ कोटींच्या मालमत्तेवर टाच; ए. एस. ट्रेडर्समधील गैरव्यवहाराचा तपास थंडावला
AS Traders Scam
AS Traders Case | घोटाळा अडीच हजार कोटींचा; ५४ कोटी निष्पन्नPudhari File Photo
Published on
Updated on

दिलीप भिसे

कोल्हापूर : महाराष्ट्रासह सात राज्यांत उलाढालीची व्याप्ती आणि अडीच हजारांवर कोटीच्या घोटाळ्यात बुडालेल्या बहुचर्चित ए.एस. ट्रेडर्ससह संलग्न सहा कंपन्यांमधील गैरव्यवहाराचा तपास थंडावला आहे. १५ संचालक, भागीदार, शाखा व्यवस्थापकासह दीडशेवर कोट्यधीश’ एजंट साडेतीन वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार आहेत. उद्योग, व्यावसायिकासह हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधीची झळ सोसावा लागलेल्या घोटाळा तपास प्रक्रियेतील ७ अधिकारी बदलले, मात्र तपासाची स्थिती ‘जैसे थे’ राहिल्याचे चित्र आहे.

गुंतवणुकीवर दामदुप्पट, तिप्पट परतावा, विदेशी टूर आणि एजंटांच्या साखळीला आकर्षक गिफ्टचे आमिष दाखवून ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपन्यांनी महाराष्ट्रासह अन्य राज्यांत अडीच ते तीन हजार कोटींची उलाढाल केली. मात्र २०२२ मध्ये संचालक, एजंटांच्या साखळीने शाहूपुरी येथील मुख्यालयाला टाळे ठोकत गाशा गुंडाळला.

कोट्यधीश एजंटांचा उजळमाथ्याने वावर!

कंपनीचा म्होरक्या लोहितसिंग सुभेदारसह २१ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्या तरी अजूनही १५ संशयित मोकाट आहेत. कंपनीच्या उलाढालीतून ‘ कोट्यधिश’ दीडशेवर एजंट उजळमाथ्याने वावरत आहेत. प्रमुख फरार संशयित अमर चौगुले, विजय पाटील, निसार मुल्ला, प्रविण पाटील,रविंद्र देसाई याचा म्हणे तपास पथकांना छडा लागत नाही.

७ अधिकारी बदलले मात्र तपास ‘ जैसे थे’ राहिला !

कोट्यवधीच्या घोटाळ्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषणकडील तपास पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आजवर तपास प्रक्रियेतील ७ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र तपास ‘ जैसे थे’ राहिला आहे. सुनिता शेळके, श्रीकांत इंगवले, औंदुबर पाटील, स्वाती गायकवाड, सरिता लायकर, रवींद्र कळमकर यांच्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्यावर तपासाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

फॉरेन्सिक ऑडिटचा अहवाल संशयाच्या भोवऱ्यात

कंपनीतील आर्थिक उलाढालीसंदर्भात फॉरेन्सिक ऑडिट झाले. पोलिस अधीक्षकांकडे त्याचा अहवाल सादर झाला आहे. त्यातही अनेक त्रुटी राहिल्याचा गुंतवणूकदारांचा आक्षेप आहे. हा अहवाल संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news