

कोल्हापूर : ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिलेला राजीनामा गुरुवारी झालेल्या ‘गोकुळ’ संचालक मंडळाच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
‘गोकुळ’ संचालकांची दि. 15 मे रोजी सभा बोलावण्यात आली होती. त्यापूर्वी ‘गोकुळ’चे नेते हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी डोंगळे यांना अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते. परंतु, सभेच्या दोन- तीन दिवस अगोदर डोंगळे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांनी राजीनामा देण्याचे नाकारून थेट जिल्ह्यातील नेत्यांनाच आव्हान दिले. त्यामुळे दि. 15 मे रोजीच्या संचालक मंडळाच्या सभेत डोंगळे यांचा राजीनामा मंजूर करून नवीन अध्यक्ष निवड करण्याचा नेत्यांचा निर्णय धुळीला मिळाला. एवढेच नव्हे, तर 15 मे रोजीची संचालक मंडळाची सभा स्थगित करण्यास सांगितले. मात्र, डोंगळे यांचा निर्णय नेत्यांनी फिरविला आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्याचे आदेश दिले. नेत्यांच्या या पवित्र्याने डोंगळे यांच्या बंडातील हवा निघून गेली. नंतर डोंगळे यांनी सभेसाठी आपली रजा पाठवून दिली.
त्यानंतर डोेंगळे यांनी देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन महायुतीचा अध्यक्ष होणार असेल तरच आपण राजीनामा देऊ, अशी भूमिका घेतली. एवढेच नव्हे, तर त्यांनी सांगितल्याशिवाय राजीनामा देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली.
त्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यावर जबाबदारी सोपविली. पाटील यांनी अन्य काही संचालकांसोबत डोंगळे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी डोंगळे मात्र राजीनामा न देण्यावर ठाम होते. राजीनामा देणे न देणे हे आता आपल्या हाती राहिले नाही, असे त्यांनी सांगितले.
गवसे येथे एका विवाह समारंभात मुश्रीफ व डोंगळे यांची भेट झाली. दोघांच्या बंद खोलीतील चर्चेनंतर डोंगळे यांनी राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला. मंगळवारी मुंबईत नेत्यांशी चर्चा करून त्यांनी आपला राजीनामा दिला. तो ‘गोकुळ’च्या मुख्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. आता हा राजीनामा विभागीय उपनिबंधक दुग्ध, पुणे यांना पाठविण्यात आला. नवीन अध्यक्ष निवडीची तारीख सहकार निवडणूक प्राधिकरण निश्चित करेल. दि. 30 किंवा 31 मे रोजी नवीन अध्यक्ष निवडीसाठी ‘गोकुळ’ संचालकांची सभा होण्याची शक्यता आहे.