

कोल्हापूर : ज्या शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या कलेला राजाश्रय दिला त्या राजांची स्मृती असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खासगीकरणातून ठेकेदाराच्या घशात घालण्याचा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केला आहे, पण कोल्हापूरची सांस्कृतिक ओळख आणि मानबिंदू असलेल्या या नाट्यगृहाचे खासगीकरण कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा एल्गार करत कोल्हापुरातील रंगकर्मींनी आंदोलन केले. नाट्यगृह महापालिकेनेच चालवले पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी केशवराव भोसले नाट्यगृहासमोरच धरणे धरले. यावेळी नाटक, चित्रपट, संगीत यांसह विविध क्षेत्रांतील कलाकार सहभागी झाले होते.
केशवराव भोसले नाट्यगृहाचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या २० जुलै रोजी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या ठरावाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. ठराव मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री वैशाली राजशेखर, अभिनेते आनंद काळे, सागर तळाशीकर, स्वप्निल राजशेखर, भरत दैनी, सागर बगाडे, प्रसाद जमदग्नी, किरणसिंह चव्हाण, धनंजय पाटील, दिनेश माळी, संजय मोहिते, राजश्री खटावकर, कृष्णा राजशेखर, शौनक राजशेखर, सुनील घोरपडे, रोहन घोरपडे, राजप्रसाद धर्माधिकारी, पंडित कंदले, जयसिंग पाटील, वेदवती सोनुले, महेश सोनुले, संग्राम भालकर, संतोष शिंदे, अनिल राबाडे व रंगकर्मींनी सहभाग घेतला.
नाट्यगृह खासगीरणाचा अंतिम प्रस्ताव हाणून पाडू, असे आश्वासन विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी दिले. महापालिकेतील काँग्रेस, शरद पवार गट राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे गट, आम आदमी पक्षाच्या नगरसेवक व नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला. यावेळी सुनील मोदी, संदीप देसाई, उत्तम पाटील, विजय देवणे, प्रवीण केसरकर, अमर समर्थ, सचिन चव्हाण, अनिल घाटगे, किशोर घाटगे, हर्षल सुर्वे, इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक आदींनी आंदोलनस्थळी भेट दिली.