कोल्हापूर : जयंतीसाठी शिवमूर्तीचे मिरवणुकीने आगमन

कोल्हापूर : जयंतीसाठी शिवमूर्तीचे मिरवणुकीने आगमन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा तिथीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी होणार्‍या पारंपरिक शिवजयंती सोहळ्याअंतर्गत गुरुवारी संयुक्त मंगळवारपेठ व उत्तरेश्वरपेठेतील शिवछत्रपतींच्या मूर्तींचे आगमन झाले. दरम्यान, संयुक्त राजारामपुरी, कोल्हापूर वीरशैव समाज यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

संयुक्त मंगळवारपेठ शिवजयंती उत्सव 

संयुक्त मंगळवारपेठ राजर्षी छत्रपती शाहू तरुण मंडळाच्या शिवजयंती उत्सवासाठी 15 फूट उंच अश्वारूढ शिवछत्रपतींच्या मूर्तीचे आगमन मिरवणुकीने झाले. गुरुवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर – नंगीवली चौक- शाहू बँक चौक- मिरजकर तिकटी या मार्गावरून ढोल- ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध तालीम संस्था, तरुण मंडळांचे कार्यकर्ते-शिवभक्त ध्वज घेऊन जयघोष करत सहभागी झाले होते.

संयुक्त उत्तरेश्वरपेठ शिवजयंती उत्सव
संयुक्त उत्तरेश्वरपेठ शिवजयंती उत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी याची सुरुवात शिवमूर्ती आगमनाने झाली. वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने शिवमूर्ती आणण्यात आली.

वीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव-बसव जयंती 

कोल्हापूर जिल्हा वीरशैव लिंगायत समाजातर्फे शिव-बसव जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. 2 व मंगळवार, दि. 3 मे या कालावधीत हा सोहळा होणार आहे. दि.2 रोजी शिवछत्रपती प्रतिमापूजन, तर दि. 3 मे रोजी सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत वरद शंकर पूजन, रक्तदान शिबिर, महात्मा बसवेश्वर प्रतिमा पूजन, वीरशैव अक्कमहादेवी महिला मंडळ भजन कार्यक्रम, जन्मोत्सव आणि महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत. सकाळी 10 वाजता चन्नवीर भद्रेश्वरमठ यांचे 'महात्मा बसवेश्वर जीवन व कार्य' या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, माजी आ. राजेश क्षीरसागर, मालोजीराजे आदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4 वाजता, पालखी मिरवणूक सोहळा होणार असल्याची माहिती अध्यक्ष सुनील गाताडे, उपाध्यक्ष चंद्रकांत स्वामी व सचिव राजू वाली यांनी कळविली आहे.

संयुक्त राजारामपुरीच्यावतीने शिवजयंतीचे आयोजन 

संयुक्त राजारामपुरी व राजारामपुरी परिसर यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवारी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी जागृती अभियान सकाळी 9 वाजता होणार आहे, तर सायंकाळी 6 वाजता मर्दानी खेळ, नाशिक ढोलांच्या दणदणाटात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 आरोग्य तपासणी शिबिर, सायंकाळी 6 वाजता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा, कोव्हिड योद्ध्यांचा सत्कार, मराठ्यांच्या शौर्यावर आधारित ऐतिहासिक महानाट्य, 'पानिपत'कार विश्वास पाटील लिखित 'पानिपतचे रणांगण' या ऐतिहासिक नाटकाचे सादरीकरण होणार आहे. सोमवारी पहाटे 5 वाजता शिवज्योतीचे आगमन, सकाळी 10 वाजता छत्रपती जन्मोत्सव, दुपारी 4 वाजता घोडे, झांजपथक, मर्दानी खेळ, पारंपरिक वेशभूषेतील मावळ्यांसह भव्य मिरवणूक निघणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news