Schoolgirl Abuse | शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्‍यास बेड्या

पोलिस कोठडी : संशयिताच्या कृत्यावर संतप्त पडसाद; नागरिक रस्त्यावर
Schoolgirl Abuse
Schoolgirl Abuse | शाळकरी मुलीवर अत्याचार करणार्‍यास बेड्या
Published on
Updated on

कोल्हापूर : सहावीत शिक्षण घेणार्‍या 13 वर्षीय परप्रांतीय मुलीला जबरदस्तीने उजळाईवाडी आणि शिंगणापूर येथील निर्जन ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार करून पीडितेच्या आई, वडिलांना जीवे मारण्याची धमकी देणारा नराधम प्रेम सचिन हेगडे (वय 22, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्यास दि. 22 पर्यंत पोलिस कोठडी बजावली.

संशयिताला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी लक्षतीर्थ वसाहतीसह परिसरातील नागरिकांनी शनिवारी रात्री उशिरा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती. पोलिस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्यासह पथकाने हेगडेच्या मुसक्या आवळल्या. रिकामटेकड्या व व्यसनाधिन असलेल्या हेगडेने पीडितेच्या कुटुंबीयांशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला गुरुवारी (दि. 8) दुचाकीवरून शिंगणापूरजवळील शेतात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर शनिवारी (दि.17) दुपारी पुन्हा उजळाईवाडीजवळ मणेर मळा येथील झाडीत नेऊन लैंगिक अत्याचार केला.

कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमकीने शाळकरी मुलगी भेदरली

लैंगिक अत्याचारासंदर्भात कोठे वाच्यता केल्यास तुझ्यासह आई, वडिलांना जीवे मारण्याची नराधमाने पीडितेला धमकी दिली. भेदरलेल्या मुलीने हा प्रकार आई, वडिलांच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र नराधमाने त्यांनाही धमकी देऊन दहशत निर्माण केली.

नराधमाच्या अटकेसाठी नागरिक पोलिस ठाण्यावर

परप्रांतीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची माहिती लक्षतीर्थ वसाहत परिसरातील नागरिकांना समजताच संतप्त नागरिकांनी नराधमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो जमावाच्या हाती लागला नाही. नागरिकांनी शनिवारी रात्री उशिरा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यावर धाव घेऊन त्याच्या अटकेची मागणी केली. जमाव संतप्त झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली. अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, पोलिस उपअधीक्षक (गृह) तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलिस अधिकारी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस नियंत्रण कक्षातील अतिरिक्त फौजफाटा पाचारण करण्यात आला.

विविध संघटनांकडून कृत्याचा निषेध

संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची वरिष्ठ अधिकार्‍यांनी ग्वाही दिल्यानंतर जमाव शांत झाला. मध्यरात्री नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या. शहरातील महिला संघटनांसह सामाजिक संस्था, संघटनांनी नराधमाच्या कृत्याचा निषेध करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news