

तानाजी खोत
कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. गल्लोगल्ली प्रचाराचा धडाका असून, कार्यकर्त्यांच्या फौजा मैदानात उतरल्या आहेत; मात्र यंदाच्या निवडणुकीत सर्वात मोठा बदल कार्यकर्त्यांच्या ‘पोटापाण्या’च्या नियोजनात झाला आहे. हॉटेल आणि धाब्यांवरील अवाढव्य बिल टाळण्यासाठी उमेदवारांनी आता ‘स्वतंत्र किचन’ आणि ‘केटरिंग’चा आधार घेतला असून, हॉटेल संस्कृतीला निवडणुकीपुरता ‘टाटा’ केला आहे.
हॉटेल ‘चॉईस’मुळे खिशाला चाट
पूर्वी प्रचाराची रॅली संपली की, कार्यकर्त्यांचे ताफे जवळच्या हॉटेल किंवा धाब्यावर धडकायचे. आपल्या आवडीनुसार कुणी चिकन, कुणी मटण, तर कुणी महागड्या शाकाहारी डिशेसची ऑर्डर द्यायचा. यामुळे उमेदवाराच्या खिशाला मोठी चाट बसायची. आता एक विश्वासू कार्यकर्ता नेमून थेट केटरिंगवाल्याला साहित्याची यादी दिली आहे. मोजक्याच पदार्थांचा बेत करायचा आणि ‘अनलिमिटेड’ जेवण असा फंडा अवलंबला जात आहे. ऐनवेळी 10-20 कार्यकर्ते वाढले, तरी त्यांचे वेगळे बिल आकारले जात नाही. हा त्याचा फायदा आहे.
महिलांसाठी सहभागासाठी...
निवडणूक प्रचारात महिलांच्या जास्तीत व वेळेत सहभागासाठी उमेदवारांनी ‘क्लाऊड किचन’ वरुन पार्सल पोहोचवले जात आहे.
मंगल कार्यालये फुल्ल
हॉटेलमध्ये जागा कमी पडत असल्याने आणि तिथे चॉईस मिळत असल्याने उमेदवारांनी पेठा, राजारामपुरी यासह उपनगरांतील छोटी-मोठी मंगल कार्यालये आणि सभागृहे महिनाभरासाठी बुक केली आहेत. दिवसभर पदयात्रा आणि घरोघरी प्रचाराने दमून-भागून आलेले कार्यकर्ते रात्री या कार्यालयांमध्ये विसावा घेत आहेत. तिथेच पंगती मांडून कार्यकर्त्यांच्या भोजनाची सोय केली जात आहे. ताटावर पैसे देण्यापेक्षा ठोक मजुरी देऊन जेवण बनवून घेतले जात असल्याने खर्चात मोठी बचत होत असल्याने उमेदवारांनी ही नवी व्यवस्था उभी केली आहे.