

कुरुंदवाड : जमीर पठाण
कोल्हापूर जिल्हा शालेय कुस्ती स्पर्धेत ३५ किलो वजनी गटात हेरवाड येथील आरोही अनिल हळाळे हिने अप्रतिम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे हेरवाड गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोहीने आपल्या जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर हे यश संपादन करत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
आरोही ही शेतमजूर अनिल मारुती हळाळे व शोभा अनिल हळाळे यांची कन्या असून तिला कुटुंबीयांकडून नेहमीच प्रोत्साहन व पाठिंबा मिळाला आहे. तिच्या या यशामागे कन्या विद्या मंदिर, हेरवाडचे मुख्याध्यापक सुभाष तराळ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. याशिवाय, प्रशिक्षक संजय देबाजे व अश्विनी देबाजे यांनी आरोहीच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी तिला कुस्तीचे बारकावे शिकवले. नियमित सरावासाठी प्रेरित केले आणि तिच्या आत्मविश्वासात भर घातली. प्रशिक्षकांनी तिच्या तंदुरुस्ती व कौशल्यावर विशेष लक्ष केंद्रित करून तिच्या कामगिरीत मोठा बदल घडवला. आरोहीने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक संजय व अश्विनी देबाजे यांच्यासह आई-वडिलांच्या पाठिंब्याला दिले आहे. तिच्या विजयामुळे गावातील नागरिकांनी तिचे जंगी स्वागत केले.
आरोहीच्या या कामगिरीमुळे तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. कुस्ती क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी ती सतत सराव करत असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करेल, असा विश्वास तिचे वडील अनिल हळाळे यांनी व्यक्त केला आहे.