

कोल्हापूर : महापालिकेतील स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. भाजपमधून प्रा. जयंत पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या पत्नी दीपाली जाधव, तर काँग्रेसमधून माजी नगरसेवक भूपाल शेटे यांच्या नावाची चर्चा आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी 17 फेब—ुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत अर्ज भरण्याची मुदत आहे.
महापालिकेत आठ स्वीकृत नगरसेवक घेतले जाणार आहेत. सभागृहातील नगरसेवकांच्या संख्याबळानुसार काँग्रेस 3, भाजप 3 आणि शिवसेना 2 असे स्वीकृत नगरसेवक असतील. गुरुवारी नगरसचिव सुनील बिद्रे यांनी भाजप, काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या गटनेत्यांना स्वीकृत नगरसेवक निवडीची माहिती दिली. अर्ज भरण्याविषयी सांगितले. त्यानुसार भाजपने पाच आणि काँग्रेसने पाच अर्ज नेले. सत्ताधारी पक्ष असल्याने भाजपकडे इच्छुकांची रीघ लागली आहे. परंतु, पक्षीय पातळीवर निर्णय झाल्याने पराभूत उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाणार नाही.
त्यामुळे पराभूत होऊनही नगरसेवकपदाचे स्वप्न पाहणार्या इच्छुकांची नावे बाजूला झाली आहेत. सद्यस्थितीत वीस वर्षे स्वीकृत नगरसेवक असलेले प्रा. पाटील हे पुन्हा भाजपच्या कोट्यातून महापालिकेत येणार आहेत. दीपाली जाधव, माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी व इतरांची नावे चर्चेत आहेत. दीपाली जाधव यांनी प्रभाग क्र. 15 व 16 मधून लढण्याची तयारी केली होती. परंतु, पक्षाकडून त्यांना थांबण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढविली नाही. शिवसेनेतून इंद्रजित आडगुळे, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचा मुलगा प्रसाद चव्हाण व रत्नेश शिरोळकर यांची नावे चर्चेत आहेत.
अडीच वर्षांचे स्वीकृत?
स्वीकृतसाठी अनेकजण इच्छुक आहेत. परिणामी, नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे अडीच वर्षांचे पद करण्याचा फॉर्म्युला पुढे येत आहे. तसे झाल्यास महापालिकेत पाच वर्षांत 16 स्वीकृत नगरसेवक होतील. भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र, काँग्रेस, शिवसेनेत त्यासंदर्भात कोणतीच चर्चा अद्याप नाही.
काँग्रेसची नावे गुलदस्त्यात...
काँग्रेसच्या स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची चर्चा गुलदस्त्यात आहे. अद्याप काँग्रेसमध्ये स्वीकृतबाबत नावांची चर्चाच नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, गेली 25 वर्षे नगरसेवक राहिलेले आणि अनेक घोटाळे उघडकीस आणलेल्या भूपाल शेटे यांना काँग्रेस संधी देण्याची शक्यता आहे. दोन प्रभागांत पॅनेल करण्यासाठी काँग्रेसने शेटे व त्यांच्या मुलगीला निवडणूक रिंगणात उतरवले होते. शेटे स्वीकृत झाल्यास काँग्रेसची सभागृहातील बाजू आणखी मजबूत होणार असल्याचे सांगण्यात येते.