प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज निर्णय

कोरटकर काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या संपर्कात : अ‍ॅड. सरोदेंचा गौप्यस्फोट
anticipatory bail verdict for prashant kortkar today
कोल्हापूर : ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे, वकिलांसह न्यायसंकुल येथे दाखल झाले इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी.Pudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत कोरटकर (रा. नागपूर) याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाला. मंगळवारी (दि. 18) अर्जावर निर्णय होणार आहे.

सुनावणीनंतर सावंत यांचे वकील व ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना, संशयित कोरटकर हा कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील काही वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या संपर्कात राहिल्याचा गौप्यस्फोट केला. त्यांंच्या सल्ल्यानेेच त्यानेे मोबाईलमधील डेटा डिलिट केल्याचाही त्यांनी आरोप केला. कोरटकरने 27 फेब्रुवारीला रात्री उशिरा सावंत यांना मोबाईलवर संपर्क साधून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांचा अवमान केला होता. कोरटकर याच्या संतापजनक कृत्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली . त्याच्याविरुद्ध कोल्हापूरसह नागपूर पोलिसात गुन्हे दाखल आहेत. संशयित कोरटकर याने येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जावर यापूर्वी तात्पुरता दिलासा मिळाला होता. आज अंतिम सुनावणी न्या. कश्यप यांच्या कोर्टात झाली. सावंत यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. श्रेया आवळे, अ‍ॅड. हेमंत काटकर, अ‍ॅड. योगेश सावंत, तर संशयिताच्या वतीने अ‍ॅड. सौरभ घाग यांनी युक्तिवाद केला.

सावंत यांना धमकी देण्याचा उद्देश काय?

अ‍ॅड. सरोदे म्हणाले, संशयित कोरटकर यांचा रात्री-अपरात्री सावंत यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांना शिवीगाळ करण्यासह जीवे मारण्याची धमकी देण्याचा उद्देशच काय, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा महापराक्रम जगाने मान्य केला असताना त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्याचा हेतू काय?

महाराजांविषयी संशयिताच्या मनात संताप, चीड : अ‍ॅड. सरोदे

कोरटकर याला कायद्याचा आदर नाही. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने त्याचा हा प्रयत्न आहे. त्याची प्रवृत्ती समाजासाठी घातक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी त्याच्या मनात चीड,द्वेश दिसतो. मोबाईलमधील डेटा डिलिट करून त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्याविरुद्ध आणखी एक कलम वाढवावे.

धमकीनंतरही सावंत यांनी संयम सोडला नाही

कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा त्याचा हेतू स्पष्ट आहे. त्याला दिलेला तात्पुरता जामीन रद्द करण्याचीही अ‍ॅड. सरोदे यांनी मागणी केली. सावंत यांनी शिवीगाळ होऊनही संयम सोडलेला नाही. कायद्याला अडचणीचे ठरेल, असे कृत्य सावंत यांच्याकडून झाले असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा असेही ते म्हणाले. प्रधान व जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. विवेक शुक्ल म्हणाले, कोरटकर याने अटक टाळण्यासाठी वेगवेगळी कारणे दिली . मोबाईल हॅक झाल्याचा त्याचा कांगावा आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याचा दावा खोटा असल्याचे दिसून आले आहे.

तात्पुरता जामीन रद्द करावा : तपासाधिकारी

संशयिताचा मंजूर केलेला तात्पुरता जामीन अर्ज रद्द करावा, अशी मागणी तपासाधिकारी तथा जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी केला.

न्यायालय आवारात कडेकोट सुरक्षा व्यवस्था

संशयित कोरटकर याच्या अर्जावर सोमवारी अंतिम सुनावणी होणार असल्याने इंडिया आघाडीसह शिवप्रेमी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालय आवारात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सावंत यांनी समाजात तणाव निर्माण केला :अ‍ॅड. घाग

कोरटकर याचे वकील अ‍ॅड. सौरभ घाग म्हणाले, कोरटकर व सावंत यांच्यात मोबाईलवर झालेले संभाषण दोघांपुरते मर्यादित असताना, सोशल मीडियावर व्हायरल कसे झाले. उलट सावंत यांनी हे संभाषण व्हायरल करून सामाजिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तपासाला कोरटकर याचे नेहमी सहाय्य राहिले आहे. यापुढेही सहाय्य करण्यास तयार असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. कोरटकरने मोबाईल व सिम कार्डही पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे त्याचा जामीन व्हावा, अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news