

कोल्हापूर : कळंबा येथील मनोरमा कॉलनीत झालेल्या गॅस स्फोटातील गंभीर जखमी अनंत देवाजी भोजणे (60, रा. मनोरमा कॉलनी) यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे स्फोटातील बळींची संख्या दोन झाली.
मनोरमा कॉलनीत सोबवारी रात्री घरगुती गॅस पुरवठा करणार्या पाईपलाईनमधून गॅसची गळती झाल्याने स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, घराचा मोठा भाग कोसळला आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटात शीतल भोजणे, त्यांचे सासरे अनंत भोजणे, मुलगा प्रज्वल व मुलगी इशिका हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.
शीतल भोजणे 80 टक्के भाजल्या होत्या. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. अनंत भोजणे 70 टक्क्यांपेक्षा अधिक भाजले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. प्रकृती खालावत गेल्याने शनिवारी सकाळी त्यांना डॉक्टरनी मृत घोषित केले.
दुर्घटनेत जखमी साडेपाच वर्षाचा प्रज्वल अद्यापही गंभीर असून त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची लहान बहीण इशिकावर देखील सीपीआरमध्येच उपचार सुरू आहेत.