Kolhapur News : व्याज परताव्यासाठी ‌‘वेट‌’, नवीन कर्जाला ‌‘ब्रेक‌’!

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेची स्थिती
Kolhapur News
व्याज परताव्यासाठी ‌‘वेट‌’, नवीन कर्जाला ‌‘ब्रेक‌’!Pudhari
Published on
Updated on

विनोद सावंत

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत सुरू असणाऱ्या योजनेतील व्याज परतावा वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. महामंडळाकडून कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. दुसरीकडे, आचारसंहितेमुळे दीड महिन्यापासून सुमारे दीड हजार नवीन कर्ज मागणीचे अर्ज रिजेक्ट केले आहेत. आचारसंहितेनंतर पुन्हा अर्ज करा, असे त्यांना सांगितले जात आहे. ‌‘जुन्या कर्जदारांना व्याज परताव्यासाठी प्रतीक्षा आणि नवीन अर्जदारांना कर्ज मिळेना,‌’ अशी स्थिती झाली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची 27 नोव्हेंबर 1998 रोजी स्थापना केली. राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास करणे, सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या महामंडळाची स्थापना झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये महामंडळास पुनर्जीवित केले. योजनेची कार्यपद्धती ही ऑनलाईन असूनही कामकाज संथगतीनेच होत असल्याची तक्रार आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेतून 12 टक्के व्याजाने 15 लाख कर्ज मिळते. नियमित कर्जाचे हप्ते भरल्यास 4 लाख 50 हजार व्याज परतावा मिळतो. तीन महिन्यांपासून व्याज परतावा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत माहिती घेतली असता संबंधित लाभार्थी व्याज परताव्यासाठी ऑनलाईन माहिती अपुरी भरतात. त्रुटीमुळे परतावा मिळण्यास अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचबरोबर नवीन कर्ज मागणी करणाऱ्यांचे अर्जही रिजेक्ट होत आहेत. त्यांना आचारसंहितेनंतर पुन्हा अर्ज करा, असे नोटिफिकेशन येत आहे. व्यावसायिक वाहन खरेदी कर्ज मागणीची हीच स्थिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news