

कोल्हापूर : जिल्ह्यात यावर्षी42 हजार 200 कोटींच्या पतपुरवठा आराखड्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्याची अंमलबजावणी करा, खरीप हंगामासाठी पीक कर्जाची जुलैअखेर 100 टक्के उद्दिष्टपूर्ती करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीच्या बैठकीत त्यांच्या हस्ते लीड बँकेच्या वार्षिक पतपुरवठा आराखडा पुस्तिका व आरसेटीच्या वार्षिक कृती आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत आर्थिक सुरक्षेचे कवच व सर्वसमावेशक विकास पोहोचवण्यासाठी सर्व यंत्रणा, बँका व अधिकार्यांनी समन्वय साधून सामूहिक व वेळेवर प्रयत्न करा. 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत ग्रामपंचायत पातळीवर जनसुरक्षा मोहीम राबवली जाणार आहे. त्याअंतर्गत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा व अटल पेन्शन या महत्त्वाच्या योजनांमध्ये बँका व संबंधित शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग घ्यावा.
सर्व बँकांनी ग्राहकांना बँक खात्यातील मिनिमम बॅलेन्स, झीरो बॅलेन्स खाते व विविध शुल्क (चार्जेस) यासंदर्भात नियम व्यवस्थित सांगा, त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्या, अशी सूचना करत जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये प्रत्येक गावामध्ये किमान एका लाभार्थ्याला लाभ द्यावा तसेच शासकीय योजनेंतर्गत प्राप्त कर्ज प्रकरणे वेळेत मार्गी लावा. यावेळी त्यांच्या हस्ते चांगली कामगिरी करणार्या बँकांचा सन्मान केला.
जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश पवार म्हणाले, कृषी क्षेत्रासाठी 7,300 कोटी रुपयांचे तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी 12,500 कोटी, तर पीक कर्जासाठी 3,900 कोटी रुपयांचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक पुनीत द्विवेदी, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभागाचे व्यवस्थापक विशाल गोंदके, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास व्यवस्थापक आशुतोष जाधव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सायबर गुन्हे व सायबर अटक याबाबत प्रत्येक बँक शाखा पातळीवर जनजागृती कार्यक्रम राबवावेत. अशा प्रकारची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत गेली पाहिजे. ती जबाबदारी बँकांचीही आहे, त्यानुसार कार्यवाही करा, असे आवाहनही जिल्हाधिकारी येडगे यांनी केले.