

कोल्हापूर : पूरस्थिती निर्माण झाल्यास, मदत आणि बचावकार्यासाठी सुसज्ज राहा. तत्काळ प्रतिसादासाठी आवश्यक ती सर्व तयारी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रविवारी आपदा मित्र व सखींना दिल्या. राजाराम बंधार्यावर पंचगंगा नदीपात्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने पूर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रात्यक्षिके करण्यात आली.
जिल्हाधिकारी येडगे यांनी प्रात्यक्षिक स्थळी भेट देऊन साहित्याची पाहणी केली. बोटीतून प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यानंतर त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांशी संवाद साधला. ते म्हणाले, अतिवृष्टी व पूरस्थितीत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी बचाव कार्याचे योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध आहे. ती सज्ज ठेवा. प्रशासन आणि आपदामित्र मदत आणि बचाव कार्यासाठी सज्ज आहेतच, आपत्कालीन परिस्थितीत आणखी सजग राहा. लोकांमध्येही जलद प्रतिसादाबाबत जागरूकता निर्माण करा.
पंचगंगा नदीपात्रात पूर व्यवस्थापनासाठी आवश्यक ठरणार्या इन्फ्लेटेबल रबर मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, रोप, इमर्जन्सी लाईट आदी साहित्याची तपासणी व चाचणी करण्यात आली. यावेळी पाण्यात बुडणार्याला वाचवणे, दोरीच्या साहाय्याने बचाव करणे, बोटीने शोधमोहीम राबवणे, बोट उलटल्यास बचावकार्य कसे करावे आदींची प्रात्यक्षिके करण्यात आली. ‘आपदामित्र’ व ‘आपदासखी’ यांच्यासाठीची प्रात्यक्षिके दि. 20 मे पर्यंत केली जाणार आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही अशाच प्रकारचे साहित्य चाचणी व प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.