

कागल : समरजित घाटगे म्हणजे कुटील, खुनशी, कटकारस्थानी प्रवृत्ती! खोट्या कारवाया पाठीमागे लावून त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा अनन्वित छळ केला. या सगळ्या षड्यंत्राच्या मास्टरमाईंडचा येत्या निवडणुकीत बंदोबस्त करा, असे आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केले. करनूर, ता. कागल येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित विराट सभेत ते बोलत होते.
आ. मिटकरी म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ हे जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करतात. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी पाठबळ दिले आणि आज त्यांच्यावर जाती-पातीचा आरोप करणार्या उमेदवारांना खड्यासारखं बाजूला करा. अहो, हे राजे ना कमळाचे झाले, ना तुतारीचे... ते फक्त फितुरीचेच होतील.
ना. मुश्रीफ म्हणाले, विरोधी उमेदवार आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर न देता बिळात जाऊन बसले आहेत. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात सात हजार कोटी रुपयांचा निधी आणला. त्याचे पुस्तक विरोधकांच्या हातातही दिले आहे. त्यातील एकही काम बिना मंजुरीचे दाखवा. मी माघार घेण्यास तयार आहे.
माझ्या कारखान्यातील एकही कर्मचारी घरातील कामासाठी घेतला नाही. कारखान्याची गाडी घेतली नाही. विरोधी उमेदवार कारखान्याच्या कर्मचार्यांना घरातील कामासाठी लावतात. गाड्या तर बेहिशेबी वापरतात. आमचा शेतकरी घामाने पिकवलेला ऊस कारखान्याला घालतो आणि त्यांच्या जीवावर विरोधी उमेदवार उड्या मारत आहे, असा आरोप माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी समरजित घाटगे यांचे नाव न घेता केला. यावेळी चंद्रकांत पाटील, विजय काळे, बाळासोा पाटील, मधुकर पाटील, दत्ताजीराव देसाई, यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत माजी उपसरपंच प्रवीण कांबळे यांनी केले. कार्यक्रमास सरपंच मंजिरी पाटील, उपसरपंच तानाजी भोसले, तातोबा चव्हाण, इम—ान नायकवडी, संभाजी पाटील, तानाजी कुंभार, के. डी. पाटील, बाबुराव धनगर, मोहम्मद शेख, बी. जी. पाटील आदी उपस्थित होते.