Gokul Milk | पाच वर्षे तुमचीच सत्ता; सखोल चौकशी करा; ‘गोकुळ’प्रश्नी आमदार अमल महाडिक यांचा टोला

Gokul Milk  |
Gokul Milk | पाच वर्षे तुमचीच सत्ता; सखोल चौकशी करा; ‘गोकुळ’प्रश्नी आमदार अमल महाडिक यांचा टोला
Published on
Updated on

कोल्हापूर : ‘आपलं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं बघायचं वाकून’ असा प्रकार सध्या सुरू असल्याचे सांगत गोकुळमध्ये सुरू असलेल्या व आरोप-प्रत्यारोप करणार्‍यांना आ. अमल महाडिक यांनी टोला लगावला. आरोप कोण करतो, कोणावर करतो? पाच वर्षे तुमचीच सत्ता होती, सगळे रेकॉर्ड तुमच्याकडे आहे, चौकशी करायची आहे, तर सखोल करा, असेही त्यांनी सुनावले.

गोकुळ संस्था टिकली पाहिजे, त्यासाठी सकारात्मक विचार करा, असे सांगत आ. महाडिक म्हणाले, गोकुळच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आदेश देतील, त्या पद्धतीने महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. प्रशासक मंडळातील काही अधिकारी राजकारण करतात, या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आरोपाबाबत बोलताना आ. महाडिक म्हणाले, प्रशासक गोकुळच्या हिताचेच निर्णय घेतील. ते जर चुकीचे काही करत आहेत, असे त्यांना वाटले तर त्यांनी भेटून त्याबाबत सांगावे, प्रशासकासोबत आपली दोन माणसे जोडून द्यावीत.

भविष्यात शहर वाढले पाहिजे

भविष्यात शहर वाढलेच पाहिजे, याकरिता ते हद्दवाढीत येण्यास नकार देत आहेत. त्यांची समजूत काढायला पाहिजे. कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही. ती केली पाहिजे, शेजारच्या लोकांनीही ते स्वीकारले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

शक्तिपीठ भविष्यासाठी गरजेचा

शक्तिपीठ महामार्ग भविष्यासाठी गरजेचा आहे. रत्नागिरी-नागपूर, समृद्धी महामार्ग, आता केलेला मिसिंग लिंक हे सर्व कनेक्टिव्हिटी वाढवणारे आहेत. शक्तिपीठ जबरदस्तीने लादणार नाही. मुख्यमंत्री जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेतील, आम्ही त्यांना त्या सांगू, त्यातून ते सकारात्मक मार्ग काढतील, असेही त्यांनी सांगितले.

सतेज पाटील यांच्यासमवेत विकासाबाबत चर्चा

मी एका साखर कारखान्याचा चेअरमन आहे. ते एका कारखान्याचे आहेत. जिल्हा बँकेत आम्ही दोघेही संचालक आहोत. त्यामुळे सगळ्यांच्या समोर भेटी होतात. राज्यातील धोरणात्मक बाबींवर, विकासावर आमची सर्वांसमोर चर्चा होत असते, असेही आ. महाडिक यांनी सांगत एकत्र येणार का, या मुद्द्याला बगल दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news