Ambeohal Project | आंबेओहळ प्रकल्पातील पुनर्वसन १०० टक्के पूर्ण होणार : मंत्री मुश्रीफ

ऑगस्टअखेर प्रशासकीय प्रक्रिया; सप्टेंबरअखेर प्रत्यक्ष पुनर्वसन पूर्ण करण्याचे आदेश
Ambeohal Project |
कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, समरजितसिंह घाटगे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे आदी.
Published on
Updated on

कोल्हापूर : आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत ऑगस्टअखेर पुनर्वसनासंदर्भातील सर्व बैठका घेऊन आवश्यक निर्णय व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करा, तसेच सप्टेंबरअखेर प्रत्यक्ष पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिले.

पाटबंधारे, पुनर्वसन आणि महसूल अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशांनुसार, आंबेओहळ मध्यम प्रकल्पातील सर्व प्रकल्पग्रस्तांना न्याय देत सप्टेंबरअखेर पुनर्वसनाचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.

आंबेओहळ प्रकल्पातील प्रलंबित कामांबाबत आतापर्यंत ४६ हून अधिक बैठका घेण्यात आल्याची माहिती देत मंत्री मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली. यावर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी ऑगस्टअखेर प्रत्येक विषयावर ठोस निर्णय घेऊन संबंधित विभागांना लेखी अंतिम आदेश देण्याचे आदेश दिले. आंबेओहळ येथील बेकनाळ व बेळकुंदी गावांतील भूसंपादन, उच्च न्यायालयातील प्रलंबित २५ प्रकरणांबाबत, संशयास्पद फेरफार व भूसंपादनाचे निवाडे, नाईलाजास्तव आर्थिक पॅकेज स्वीकारलेल्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप, मौजे कर्पेवाडी येथील प्रकरणे, दिवाणी न्यायालय गडहिंग्लज येथील दावे तसेच इतर वैयक्तिक प्रकरणांचा समावेश आहे.

याशिवाय, त्यांनी कसबा सांगाव व धामणे येथील जलजीवन मिशन योजनेतील कामे, बेलेवाडी मासा येथील पाझर तलाव, म्हाडा गृह प्रकल्प आदी विषयांबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, समरजितसिंह घाटगे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, संबंधित कार्यकारी अभियंता, जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news