Ambedkar Jayanti 2026 : बिंदू चौकात उसळला भीमसागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील पहिल्या पुतळ्याला अभिवादन
Ambedkar Jayanti
कोल्हापूर ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक बिंदू चौकात डॉ. आंबेडकर यांच्या जगातील पहिल्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सोमवारी रात्री 12 च्या सुमारास अनुयायांचा असा भीमसागर उसळला होता. (छाया ः पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर ः राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. 13) रात्री बिंदू चौकात भीमसागर उसळला. ‌‘उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे‌’ ही भावना मनात साठवून हजारो भीम अनुयायांनी जगातील डॉ. आंबेडकर यांच्या पहिल्या पुतळ्याला अभिवादन केले.

रात्रीचे बारा वाजण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या या जनसमुदायात एक वेगळीच ऊर्जा होती. ‌‘जय भीम‌’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या गर्दीत सर्वच वयोगटातील अनुयायी होते. बहुतांश जणांनी शुभ कपडे परिधान केले होते. बिंदू चौकातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्ती लावून, हार-फुले अर्पण करत अनुयायी नतमस्तक होत होते. काही क्षण शांततेत डोळे मिटून अभिवादन करत होते. त्या क्षणी बिंदू चौक हा केवळ एक चौक राहिला नव्हता, तर तो विचारांचा आणि प्रेरणेचा केंद्रबिंदू बनला होता. दरम्यान, रात्री दहा वाजल्यापासूनच ढोल-ताशांचा गजर सुरू झाला होता. वेगवेगळ्या भागांतून गटागटाने येणारे अनुयायी निळे झेंडे फडकावत, जयघोष करत चौकाकडे येत होते. रात्री 11 वाजल्यानंतर तर बिंदू चौक अक्षरशः भरून गेला. महिला, तरुण-तरुणी, बालके आणि वृद्ध सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी बुद्ध वंदना झाली. आणि काही क्षणांसाठी संपूर्ण परिसर शांततेत न्हाऊन निघाला. घड्याळाचे काटे बारा वाजल्याचा क्षण दाखवताच फटाक्यांची आतषबाजी झाली. एकमेकांना जयंतीच्या शुभेच्छा देत, आनंद व्यक्त करत अनुयायी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news