कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात गुरुवारी ललिता पंचमीनिमित्त श्री अंबाबाई आणि श्री त्र्यंबोली देवीच्या गळाभेटीचा सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी कुमारिका नारायणी गुरव हिच्या हस्ते कोल्हासुराच्या वधाचे प्रतीक असलेल्या कुष्मांड (कोहळा) भेदनाचा विधी झाला. कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी होणाऱ्या हुल्लडबाजीला आळा घालण्यासाठी मानकऱ्यांनी अख्खा कोहळा पळवला आणि सुरक्षित जागी फोडला. यावेळी काही तरुणांची कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी झुंबड उडाली; मात्र पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले.
कोल्हासुर वधाच्या आनंदोत्सवाला निमंत्रित न केल्याने रुसलेल्या त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई ललिता पंचमीला त्र्यंबोली भेटीला गेली होती. नवरात्रौत्सवात या दिवसाची महती मोठी आहे. सकाळी दहा वाजता करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची पालखी त्र्यंबोली मंदिराकडे जाण्यासाठी गरुड मंडपातून बाहेर पडली. भवानी मंडप येथून तुळजाभवानीची पालखीही त्र्यंबोलीकडे मार्गस्थ झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व गुरू महाराजांच्या पादुकाही मिरवणुकीत सहभागी होत्या. पारंपरिक वाद्यांच्या गजरात भालदार, चोपदार या लवाजम्यात अंबाबाईची पालखी बिंदू चौक, उमा टॉकीज चौक, बागल चौकातून शाहू मिल येथे दर्शनासाठी थांबली. त्यानंतर राजाराम रोड, टाकाळा येथे आली. प्रथेनुसार टाकाळा खण येथे पालखीचा विसावा झाला. पालखी मार्गावर दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
दुपारी पाऊण वाजता पालखी त्र्यंबोली मंदिरात आली. त्यानंतर संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे यांचे आगमन झाले. अंबाबाई आणि त्र्यंबोलीच्या गळाभेटीचा सोहळ्या साजरा करण्यात आला. आरती केल्यानंतर त्र्यंबोली मंदिर परिसर अंबाबाई आणि त्र्यंबोलीच्या जयघोषाने दुमदुमला. कुमारिका नारायणी गुरव हिच्या हस्ते कोहळ्याला त्रिशुलाने भेदण्याचा पारंपरिक विधी करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची त्र्यंबोली मंदिर परिसरात गर्दी झाली होती. कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी दरवर्षी मोठी झुंबड उडते आणि त्यातून हुल्लडबाजी वाढते. यंदा हुल्लडबाजी होऊ नये यासाठी देवस्थानच्या मानकऱ्यांनी कोहळा सुरक्षित ठिकाणी फोडला.
पालखी मार्गावर आकर्षक सजावट व प्रसादवाटप
उमा टॉकीजपासून बागल चौक, टाकाळा रोड मार्गावर पालखीच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या, रांगोळ्या, कमानी उभारल्या होत्या. राजारामपुरी जनता बाजार चौकात झोपाळ्यातील गणपती देखावा केला होता. टाकाळा चौकात बालाजीसह अंबाबाईचे दर्शन अशी सजावट केली होती. सामाजिक संस्था, मंडळे, महिला गट यांच्या वतीने सरबत, प्रसादवाटप करण्यात आले. ओटी भरण्यासाठी गर्दी झाली होती.