अनुराधा कदम
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मंदिराच्या दगडी बांधकामाची मजबुती वाढविण्यासाठी राजस्थानमधील चितोडिया समाजातील कारागीरांकडून ‘डचमन प्रक्रिया’ राबविण्यात येत आहे. पाऊस, उन्हाळा, आर्द्रता आणि कालौघामुळे दगडांमध्ये निर्माण झालेल्या सूक्ष्म चिरा, फटी व झिजलेल्या भागांची दुरुस्ती केली जात आहेे. अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात मंदिराचे संवर्धन, जतन आणि संरचनात्मक संरक्षणाची कामे सुरू आहेत.
डचमन रिपेअर अन् त्याचे फायदे...
डचमन रिपेअर ही ऐतिहासिक दगडी, लाकडी किंवा वारसा वास्तूंच्या संवर्धनासाठी वापरली जाणारी विशेष दुरुस्ती पद्धत आहे. या तंत्रामध्ये संपूर्ण दगडी भाग बदलला जात नाही. त्याऐवजी फक्त तडा गेलेला, झिजलेला किंवा खराब झालेला भाग काळजीपूर्वक काढून त्याच आकाराचा, त्याच प्रकारच्या दगडाचा नवीन तुकडा बसविला जातो. यामुळे मूळ वास्तूचे स्वरूप, मजबुती आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य कायम राहते. मूळ ऐतिहासिक दगडी बांधकाम जतन होते. दगडातील तडे, फटी आणि झीज भरुन येते. पाऊस, आर्द्रता आणि तापमानातील बदलांमुळे होणारे नुकसान टाळता येते.