अंबाबाई मंदिराच्या सुरक्षेबाबत पोलिसांचा अहवाल लवकरच
कोल्हापूर : सध्या देशात युद्धजन्य परिस्थितीमुळे तणावाचे वातावरण आहे. पर्यटनस्थळे, मंदिरे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याची खबरदारी म्हणून सर्वच मंदिर परिसरातील सुरक्षेबाबत दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या वतीने अंबाबाई मंदिरातील सुरक्षा यंत्रणेचे सर्वेक्षण करण्यात आले. यातील नोंदीनुसार अंबाबाई मंदिरातील सुरक्षेबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.
या सर्व्हेअंतर्गत मंदिरातील सुरक्षारक्षकांची संख्या, पर्यटक संख्येच्या तुलनेत कार्यान्वित असलेल्या सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन काळातील सुविधा, मंदिर आवारातील अडगळ, गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड येथील बांधकाम साहित्य, बॅग स्कॅनर, बॅग कक्ष याची पाहणी केली. जुना राजवाड्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली सात पोलिसांची टीम या पाहणीमध्ये समाविष्ट होती.

