Ambabai Temple | अंबाबाईच्या खजिन्यात श्रावणात ४१ लाखांचे दान

​पूजा-अभिषेक, अन्नदान अन् देणगीतून मोठा निधी; डिजिटल व्यवहारांनाही भाविकांची मोठी पसंती
Ambabai Temple |
Ambabai Temple | अंबाबाईच्या खजिन्यात श्रावणात ४१ लाखांचे दान
Published on
Updated on

​कोल्हापूर : अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने मंदिरात येतात. अंबाबाईवर असलेल्या अथांग श्रद्धेतून भाविक मंदिराला मुक्तहस्ते दानही अर्पण करत असतात. श्रावण महिन्यात भाविकांकडून वेगवेगळ्या माध्यमांतून मंदिराच्या खजिन्यात तब्बल ४१ लाख २० हजार ७०८ रुपये जमा झाले आहेत. ​मंदिर प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भाविकांनी केवळ रोख रकमेतच नव्हे, तर ऑनलाईन प्रणालीचा वापर करूनही सढळ हाताने दान दिले आहे. ​अन्नदान असो वा पूजा, भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

पूजा-अभिषेक साठी १५ लाख

मंदिरात होणाऱ्या विविध पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधींसाठी भाविकांनी तब्बल १५ लाख २९ हजार ७७ रुपये अर्पण केले आहेत. विशेष म्हणजे, यासाठी भाविकांनी रोख रकमेसोबतच ऑनलाईन माध्यमांद्वारे ७ लाख ४५ हजार रुपये दान केले आहेत.

​देणगी स्वरूपातील दान

मंदिराच्या विविध उपक्रमांसाठी आणि विकासासाठी भाविकांनी थेट देणगीच्या स्वरूपात १६ लाख ७९ हजार २०७ रुपये अर्पण केले आहेत. यात सर्वाधिक रक्कम बँकेत रोखीने जमा करण्यात आली आहे.

मंदिरात येणाऱ्या भक्तांना महाप्रसाद मिळावा यासाठी अन्नदान सेवा चालवली जाते. या अन्नदानासाठी भाविकांनी ९ लाख १२ हजार ४२४ रुपयांचे योगदान दिले आहे. ​बदलत्या काळानुसार आता भाविक मंदिरात येऊन देणगी देण्यासोबतच घरबसल्या ऑनलाईन देणगी देण्यालाही प्राधान्य देत आहेत. गेल्या महिन्यात १७ लाख ७८ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट ऑनलाईनद्वारे मंदिराच्या बँक खात्यात जमा झाली आहे. तर १९ लाख १३ हजार रुपयांची रोख रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. उर्वरित सुमारे ४ लाख २९ हजार रुपये मंदिर कार्यालयातील कॅश काउंटरवर जमा झाले आहेत.

श्रावणात ८ लाख ४३ हजार भाविकांची हजेरी

१. श्रावण महिन्यानिमित्त श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. १३ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत तब्बल ८ लाख ४३ हजार ६८५ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. श्रावणातील प्रत्येक दिवशी मंदिर परिसरात भाविकांची लगबग पाहायला मिळाली.

२. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि अन्य राज्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने कोल्हापुरात दाखल झाले. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था, रांगेचे नियोजन आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. गर्दीच्या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीनेही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news