

कोल्हापूर : श्री करवीरनिवासिनी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील 143.90 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. राज्य पुरातत्त्व विभागाकडून कामाचे अंदाजपत्रक तयार केले जात आहे, ते येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल, यानंतर त्याला आठ दिवसांत तांत्रिक मान्यता घेतली जाणार असून, त्यानंतर तत्काळ निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामुळे येत्या दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी सांगितले.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या 1,445.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला चौंडी येथे दि. 6 मे रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली. यानंतर या आराखड्याचे दि. 15 जुलै रोजी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत सादरीकरण झाले. उच्चाधिकार समितीची त्याला मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यातील 143.90 कोटींच्या कामांना दि. 28 ऑगस्ट रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
पहिल्या टप्प्यात जतन, संवर्धनाची कामे
पहिल्या टप्प्यात अंबाबाई मंदिर आणि परिसरातील अन्य मंदिरे, 64 योगिनींच्या मूर्ती यांचे जतन आणि संवर्धनाचे सर्व काम, तसेच परिसरातील डागडुजी, वॉटरप्रूफिंग, विद्युत आणि ड्रेनेज व्यवस्थेशी संबंधित कामेही केली जाणार आहेत.
पुरातत्त्व विभागाकडून अंदाजपत्रक
या कामांसाठी राज्य पुरातत्त्व विभागाकडून अंदाजपत्रक तयार केले जात आहे. प्रत्यक्ष काम आणि त्याकरिता होणारा खर्च, याबाबतचे सूक्ष्म अंदाजपत्रक तयार केले जात आहे, ते अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसांत ते पूर्ण होणार आहे.
आठ दिवसांत तांत्रिक मान्यता
हे अंदाजपत्रक राज्य पुरातत्त्व विभागाच्या संचालकांकडे तांत्रिक मान्यतेसाठी आठ दिवसांत सादर केले जाणार आहे. त्याला तांत्रिक मान्यता मिळाली की, तत्काळ निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
‘पुरातत्त्व’च्या नियंत्रणाखालीच काम होणार
पहिल्या टप्प्यातील सर्व कामे राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखालीच होणार आहेत. याकरिता पुरातत्त्व विभागाच्या पॅनेलवरील कंत्राटदारांचीच निवड केली जाणार आहे.
भूसंपादनाचा अहवाल सादर
या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येणार्या भूसंपादनाचे धोरण आणि कार्यपद्धती ठरविण्यासाठी नगरविकास विभागाचे (क्रमांक 1) अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीचीही स्थापना करण्यात आली. या समितीला जिल्हा प्रशासनाने आपला अहवाल सादर केला आहे, त्यानुसार येत्या आठ-दहा दिवसांत त्याबाबतही बैठक होईल, असेही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
भाविकांसाठी भूमिगत दर्शन रांग
मंदिर परिसराचा तीन टप्प्यांत विकास केला जाणार आहे. दुसर्या आणि तिसर्या टप्प्यांत परिसरातील विविध बांधकामे केली जाणार आहेत. त्यात एकूण चार हजार भाविकांसाठी भूमिगत दर्शन रांग आहे. त्यापैकी एकूण चार हॉलमध्ये एक हजार भाविकांना बसता येईल, असा दर्शन मंडप असेल. याखेरीज भूमिगत 109, तळमजला 78, पहिला मजला 78, तर दुसर्या मजल्यावर 32 अशी एकूण 297 दुकाने या ठिकाणी बांधण्यात येणार आहेत.