

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील 143 कोटी 90 लाख रुपयांच्या कामांच्या आराखड्याला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी नियोजन विभागाने काढला.
चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे 6 मे रोजी झालेल्या बैठकीत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या 1445.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली होती. यानंतर 15 जुलै रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हा आराखडा सादर केला होता. गुरुवारी त्या 143 कोटी 90 लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली.
पहिल्या टप्प्यात मंदिर आणि परिसरातील मंदिरांच्या संवर्धनाची कामे तसेच मंदिर परिसरात 64 योगिनींच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम होणार आहे. या सर्व कामांचा पुरातत्त्व विभागाकडून आराखडा तयार केला जात आहे. दरम्यान, प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उच्चाधिकार समितीचे आभार मानले.
कामांसाठी डेडलाईन
या विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे 31 मार्च 2028 पर्यंत पूर्ण करावी लागणार आहेत. तशी डेडलाईनच या आदेशात घालून दिली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करून घेण्याची जबाबदारी संनियत्रण अधिकारी म्हणून जिल्हाधिकार्यांची राहणार आहे.
विविध समित्या होणार
या आराखड्यातील कामांसाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीसह सल्लागार नेमणे आदी विविध कामांसाठी समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. त्यानुसार त्या त्या समितीकडे असलेल्या जबाबदार्या त्यांना पूर्ण कराव्या लागणार आहेत.