

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकास प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या गाभारा संवर्धनाच्या कारणास्तव भाविकांसाठी अंबाबाईचे दर्शन कासव चौकातून सुरू आहे. विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात मंदिर संवर्धन व जतन कामांना गती आली आहे. यादरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अंबाबाईच्या मूळ मूर्तीच्या दर्शनाची सोय कासव चौकातून करण्यात आली आहे. पेटी चौकातील प्रवेश पुढील काही दिवस बंद राहील, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
14 ते 17 मार्च या कालावधीत गाभार्यातील फरशीचे काम सुरू होते. त्या दरम्यान अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद ठेवून उत्सवमूर्ती व कलश दर्शन सुरू ठेवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा अंबाबाईची मूळ मूर्तीच्या दर्शनासाठी गाभारा खुला करण्यात आला. अजूनही गाभार्यातील काही भागांचे काम सुरू असल्यामुळे भाविकांना कासव चौकातूनच दर्शन घ्यावे लागत आहे.