Ambabai Temple Conservation Work | अंबाबाई मंदिर संवर्धनाचे काम आधी; तज्ज्ञ नियुक्ती नंतर!

पुरातत्त्व विभागाचा सावळा गोंधळ; कानउघाडणीनंतर जाहिरात प्रसिद्ध
कोल्हापूर : अंबाबाई मंदिराचे संवर्धन व जतन काम.
कोल्हापूर : अंबाबाई मंदिराचे संवर्धन व जतन काम. (संग्रहित छायाचित्र)
Published on
Updated on

कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या जतन व संवर्धन कामात गंभीर त्रुटींचे आरोप, पुरातत्त्व विभागाच्या कार्यपद्धतीवर उपस्थित झालेले प्रश्न आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेली कानउघाडणी या सर्व घडामोडींनंतर आता पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाने मंदिराच्या संवर्धनासाठी तज्ज्ञ नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ‘संवर्धनाचे काम आधी... आणि तज्ज्ञ नंतर’ असा पुरातत्त्व विभागाचा उलटा कारभार समोर आला आहे.

अंबाबाई मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागाच्या नियमांचे पालन न करता हानिकारक पद्धती वापरण्यात आल्याचा आरोप शहर कृती समिती, इतिहास संशोधक, मंदिर अभ्यासक आणि विविध सामाजिक संघटनांनी केला होता. ऑगस्ट २०२५ पासून सुरू असलेल्या संवर्धन कामावर लक्ष ठेवण्यासाठी पुरातत्त्व विभागाचा कोणताही जबाबदार तज्ज्ञ अधिकारी कायमस्वरूपी उपस्थित नसल्याने तांत्रिक पडताळणीअभावी कामात गंभीर त्रुटी झाल्याबाबत संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. सुरुवातीला पुरातत्त्व विभागाने हे सर्व आरोप फेटाळून लावले. मात्र, २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संवर्धन प्रक्रियेबाबत पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले आणि कामाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले.

या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार

जर संवर्धनाच्या कामासाठी तज्ज्ञ अभियंत्याची आवश्यकता होती, तर गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेले काम नेमके कोणाच्या देखरेखीखाली झाले? पुरातत्त्व विभागाच्या निकषांचे पालन होत आहे की नाही, याची जबाबदारी कोणाकडे होती? या प्रश्नांची उत्तरे आता पुरातत्त्व विभागाला द्यावी लागणार आहेत.

अंबाबाई मंदिरासाठी पुरातत्त्वतर्फे तज्ज्ञ अभियंतापदासाठी जाहिरात देण्यात आली आहे. वारसा वास्तुसंवर्धनाचा अनुभव असलेल्या अभियंत्याची नियुक्ती प्रकल्प पूर्ण होईपर्यंत राहणार आहे.

डॉ. विलास वहाने (सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग)

‘अंबाबाई मंदिरासारख्या जागतिक वारसा मूल्य असलेल्या प्राचीन मंदिराच्या संवर्धनाचे काम आधी काम सुरू झाले आणि आता दहा महिन्यांनी तज्ज्ञ अभियंता नेमण्याची वेळ आली आहे. यावरून नियोजनातील गंभीर त्रुटी स्पष्ट होतात. आतापर्यंत झालेल्या कामांची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून जबाबदारी निश्चित केली पाहिजे.’
हर्षल सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news