

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकासाचा सुधारित आराखडा आता बुधवारी सादर होण्याची शक्यता आहे. 400 ते 500 कोटींच्या तीन टप्प्यांचे स्वतंत्र आराखडे सादर केले जाणार की, 1445 कोटींच्या मूळ आराखड्यातच सुधारणा करून तो पुन्हा सादर होणार हे मंगळवारी सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. सुधारित आराखडा बुधवारपर्यंत सादर होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
श्री अंबाबाई मंदिर पुनर्विकासाचा 1445 कोटी 97 लाख रुपयांचा राज्य शासनाला सादर केलेल्या आराखड्यात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीने सुधारणा सुचवल्या होत्या. एकाच टप्प्यात आराखडा सादर करण्याऐवजी त्याचे टप्पे करावे, कामांचा प्राधान्य क्रम निश्चित करावा, त्यानुसार आराखड्यात सुधारणा करावी, अशी सूचना उच्चाधिकार समितीच्या बैठकीत देण्यात आली होती.
बैठकीतील सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाकडून मूळ आराखड्याचे तीन टप्पे करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार 400 ते 500 कोटींपर्यंतचा एक टप्पा यानुसार आराखडा तयार केला जात आहे. मूळ आराखड्याचेच तीन टप्पे निश्चित केले आहेत. दरम्यान, उच्चाधिकार समितीच्या बैठकीचे इतिवृत्त प्राप्त झालेले नाही, ते मंगळवारी प्राप्त होईल.
उच्चाधिकार समितीच्या नेमक्या सुचना काय आहे, हे समजल्यानंतरच यावरच मूळ आराखड्याचे टप्पानिहाय स्वतंत्र आराखडे तयार करून पहिला टप्पा अगोदर सादर करायचा की, मूळ आराखड्यातच सुधारणा करून त्याचे तीन टप्पे करून ते एकत्रित सादर करायचे हे स्पष्ट होईल. त्यानंतरच आराखडा सादर केला जाणार आहे. मंगळवारपर्यंत आराखडा कसा करायचा हे स्पष्ट होईल आणि बुधवारपर्यंत तो राज्य शासनाला सादर होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.