

कोल्हापूर : श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यासाठी करण्यात येणार्या भूसंपादनात संभाव्य बाधित होणार्या बांधकामांचा सविस्तर अहवाल दोन दिवसांत द्या, असे आदेश महापालिका प्रशासनाला देण्यात आले. या भूसंपादनासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीचे सदस्य सचिव तथा राज्याच्या नगररचना विभागाच्या संचालकांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत हे आदेश देण्यात आले.
श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकासासाठी 1,445.97 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. हा आराखडा तीन टप्प्यांत राबविला जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यातील 143.90 कोटींच्या मंदिर संवर्धनाशी संबंधित कामांचा पुरातत्त्व विभागाने आराखडा केला आहे. त्याला येत्या चार दिवसांत तांत्रिक मान्यता मिळताच या कामाची निविदा काढली जाईल आणि हे काम सुरू होईल.
आराखड्याच्या दुसर्या आणि तिसर्या टप्प्यात दर्शन रांग, दर्शन मंडप, शॉपिंग प्लाझा, अन्नछत्र, पार्किंग आदी कामे होणार आहेत. याकरिता मंदिर परिसरातील सुमारे साडेचार एकर जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. या भूसंपादनासाठी 980 कोटी 12 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. मात्र, हा अपेक्षित खर्च कमी करण्यासाठी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीला जिल्हा प्रशासनाने आपला अहवाल सादर केला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर या नगरचना विभागाच्या संचालकांनी आढावा बैठक घेतली.
या बैठकीत भूसंपादनाबाबत सविस्तर चर्चा झाली. महापालिका मिळकत उतार्याप्रमाणे नेमकी बांधकामे किती आहेत, त्यापैकी कूळ किती मूळ मालक किती. यातील किती प्रकरणांत न्यायालयीन वाद आहेत, भूसंपादन करताना कूळ आणि मालक यांची तडजोड कशी होईल, त्यानुसार भरपाईच्या रकमेचे प्रमाण कसे राहील, ज्या प्रकरणात तडजोड होणार नाही, अशी किती प्रकरणे असतील आदी सर्व बाबींचा यावेळी आढावा घेण्यात आला. यानंतर बाधित होणार्या सर्व मिळकतींचा सर्वकष अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराचा विकास आराखडा एकूण साडेअकरा एकर जागेत राबविला जाणार आहे. यापैकी सुमारे दोन एकर परिसर अंबाबाई मंदिराचा आहे. सुमारे अडीच एकर जागा ही हेरिटेजची आहे, तर सुमारे अडीच एकर जागा महापालिकेची आहे. यामध्ये रस्त्यांचाही समावेश आहे. आराखड्यासाठी मंदिराभोवतालच्या साडेचार एकर जागेचे संपादन करावे लागणार आहे.