कोल्हापूर : माझ्या अंबाबाईचा रथोत्सव या भक्तिगीताचे सूर... ढोलताशांचा गजर, रंगीबेरंगी रांगोळ्या व फुलांच्या पायघड्या, भालदार, चोपदारांच्या लवाजम्यासोबत फुलांनी सजवलेला रथ, त्यामध्ये विराजमान अंबाबाईची उत्सवमूर्ती, नयनरम्य रोषणाई, आतषबाजी अन् रथोत्सव मार्गावरील पुष्पवृष्टी अशा मांगल्याने भारलेल्या वातावरणात श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा गुरुवारी रात्री मोठ्या थाटात संपन्न झाला.
जोतिबा चैत्र यात्रेच्या दुसर्या दिवशी होणार्या या शाही सोहळ्याचे ‘याची देही याची डोळा’ साक्षीदार होण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची अलोट गर्दी झाली होती. जिल्हाधिकारी अमोल येडगे, जि.प. सीईओ कार्तिकेयन एस., आ. राजेश क्षीरसागर, मालोजीराजे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या उपस्थितीत रथपूजन करण्यात आले.
लवाजम्यासह हा रथ नगरप्रदक्षिणेसाठी महाद्वार चौक, महाद्वार रोडमार्गे गुजरी कॉर्नर येथे आला. यावेळी न्यू गुजरी मित्र मंडळातर्फे गुजरी कॉर्नर येथे आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर भवानी मंडपमार्गे तुळजाभवानी मंदिरासमोर आल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. त्यानंतर खासबाग, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे अंबाबाई मंदिरात रथोत्सवाची सांगता झाली.
‘अंबा माता की जय’चा जयघोष
गुरुवारी रात्री नऊ वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर ‘अंबा माता की जय’च्या जयघोषात परंपरागत वाद्यांच्या गजरात अंबाबाई मंदिरापासून रथोत्सवाला प्रारंभ झाला. प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतषबाजी करण्यात येत होती.
स्वागत स्टेज कोसळले
गुजरी कॉर्नर येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने रथोत्सवासाठी स्वागत स्टेज उभारले होते. रात्री दहाच्या सुमारास नेत्यांसह भाविकांनी गर्दी केल्याने स्टेज कोसळले. यामध्ये काही भाविक किरकोळ जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी हटवली.