

कोल्हापूर/चौंडी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी 1 हजार 445 कोटी 97 लाख, तर दख्खनचा राजा जोतिबा मंदिर परिसर विकासाच्या पहिल्या टप्प्यासाठी 259 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांना चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या पर्यटन आणि विकासाला गती येणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे मंगळवारी झाली. अहिल्यादेवी यांच्या मंदिर पुनर्निर्माणाच्या कार्याला अभिवादन म्हणून राज्यातील विविध मंदिर विकास आराखड्यांना एकूण 5,503.69 कोटी रुपयांची राज्यस्तरीय मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या 1 हजार 445.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला, तर श्री जोतिबा मंदिर परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील 259.59 कोटी रुपयांच्या कामांना, अशा एकूण 1 हजार 705 कोटी 56 लाख रुपयांना मंजुरी देण्यात आली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या दोन्ही आराखड्यांचे मंत्रिमंडळासमोर सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालक सचिव तथा राज्याच्या वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा प्रमुख उपस्थित होते.
या मंजुरीनंतर प्रकाश आबिटकर यांनी दोन्ही आराखडे मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन व विकासकार्याला गती मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने दोन्ही मंदिरांसाठी सखोल अभ्यास करून आवश्यक व प्राधान्य कामांचा समावेश करत उपयुक्त आराखडा तयार केला आहे. हे सर्व भाविकांसाठी आनंददायक ठरणार आहे. विकास आराखडा तयार करण्यापासून मंजुरीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपण विशेष लक्ष दिल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर व रोहित तोंदले, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे, उपअभियंता सुयश पाटील, तसेच कन्सल्टंट व आर्किटेक्ट संतोष रामाणे, अभिनंदन मगदूम आदी उपस्थित होते.
अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिर विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन या विकास आराखड्यातील कामांना लवकरच सुरुवात होईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. राज्य शासनाच्या सूचनांनुसार पुढील प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाईल, असेही ते म्हणाले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार योजना सुरू करण्यास आज मंत्री परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. महिलांच्या आरोग्याबाबत समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे, कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे. मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणे, लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करणे, पंचायतराज पद्धतीत महिला नेतृत्वाचा सहभाग वाढविणे, महिलांना आर्थिक सक्षम करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत. अभियान राबविण्यासाठी सुमारे साडेदहा कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार वितरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही बदल अथवा काही सुधारणा करणे अपेक्षित असेल, तर महिला व बालविकासमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीस अधिकार प्रदान करण्यासही मान्यता देण्यात आली.