कोल्हापूर : ढगाळ हवामान, हवेतील वाढते धूलिकण आणि गर्दीमुळे हवेतील आर्द्रतेचे 54 टक्के प्रमाण यामुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या दुसर्या दिवशी सूर्यास्ताची किरणे देवीच्या केवळ चरणांपर्यंतच पोहोचली. आज रविवारी किरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित असताना 5 वाजून 42 मिनिटांनी मूर्तीच्या चरणस्पर्शानंतर पुढच्या चार मिनिटांत किरणे लुप्त झाली. दरम्यान, उद्या (ता. 11) किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी किरणांचा मुखस्पर्श होण्याची आशा आहे.
अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याला 8 नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे; तर 9 ते 11 नोव्हेंबर या तीन दिवसांत किरणोत्सवाचा मुख्य सोहळा सुरू आहे. शनिवारी, दि. 9 रोजी मावळतीची किरणे अंबाबाई मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे आज रविवारी, दि. 10 रोजी किरणोत्सव तीव—तेने होऊन अस्ताची किरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचतील, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. सायंकाळी साडेचार वाजल्यापासूनच किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी मंदिराच्या आवारात गर्दी केली होती. गणपती चौक ते पेटी चौकात काही भाविक, अभ्यासक थांबले होते. तर मंदिराच्या आवारात देवस्थानच्या वतीने लावलेल्या स्क्रीनवर किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली होती. मात्र, किरणांच्या आड ढग आल्याने भाविकांची निराशा झाली.
मावळतीची किरणे महाद्वाराची कमान ओलांडून गरुड मंडपात येईपर्यंत किरणांची प्रखरता अत्यंत तीव— होती. 15 हजार 300 लक्स तीव—तेने किरणांनी गरुड मंडपाचाही टप्पा ओलांडला. मात्र, गणपती चौकात येताना हवामानात बदल झाला आणि किरणांमध्ये ढग आड आले. याचवेळी हवामानातील आर्द्रतेचे प्रमाण 36 टक्क्यांवरून 54 टक्क्यांपर्यंत वाढले. परिणामी, किरणे परावर्तित झाल्याने गाभार्याच्या दिशेने किरणांचा प्रवास कमी तीव—तेने सुरू झाला. कासव चौक, पितळी उंबरा, पेटी चौकातून कटांजनापर्यंत पोहोचणार्या किरणांची प्रखरता ढगाळ हवामानामुळे घटत चालली होती.
दरम्यान, अंबाबाईच्या चरणांना स्पर्श होताच किरणे लुप्त झाल्याने किरणोत्सवाचा पुढचा टप्पा झाला नाही. किरणांच्या चरणस्पर्शानंतर घंटानाद करून अंबाबाईची आरती करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी, खगोलशास्त्राचे अभ्यासक , विद्यार्थी यांनी किरणोत्सवाच्या शास्त्रीय नोंदी घेतल्या.