

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आणि जोतिबा परिसर विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात होईल. त्याचा शासन आदेश येत्या आठ दिवसांत निघणार आहे. त्यानुसार कामांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून कामे गतीने, नियोजनबद्ध करा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या दोन्ही आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले.
अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकासाच्या1 हजार 445 कोटी 97 लाख रुपयांच्या आराखड्याला आणि जोतिबा मंदिर परिसर विकासाच्या 1 हजार 816 कोटी रुपयांच्या आराखड्याला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यापैकी 259 कोटी 59 लाख रुपयांच्या पहिल्या टप्प्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश येत्या आठ दिवसांत निघाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
अंबाबाई मंदिराच्या पहिल्या टप्प्यात मंदिर संवर्धन आणि परिसरातील भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादनासाठी 257 कोटी, तर मंदिर संवर्धनाच्या कामांसाठी 252 कोटींचा निधी आवश्यक आहे. मंदिर परिसरातील कामांचाच पहिल्या टप्प्यात समावेश असल्याने ती तातडीने सुरू करता येणे शक्य आहे. जोतिबा मंदिर विकासाच्या पहिल्या टप्प्यातही मंदिराशी संबंधित कामे होणार आहेत. यामुळे निधीबाबत आदेश होताच, ही दोन्ही कामे तत्काळ सुरू करता येतील, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
आदेशानंतर तत्काळ कामांचे आराखडे तयार करणे, त्यांना तांत्रिक मान्यता घेणे, त्याबाबतच्या निविदा काढणे आणि प्रत्यक्षात काम सुरू करणे ही कामे गतीने करावीत. वेळापत्रकानुसारच कामे करा. स्थानिक नागरिकांना विश्वासात घ्या, त्यांच्याशी संवाद साधा, त्यांची बैठक घ्या, अशा सूचनाही आबिटकर यांनी दिल्या. देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत आयरेकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अंबाबाई मंदिर : सात हजार भाविक क्षमतेची दर्शन रांग, दर्शन हॉल, दर्शन रांगेतील बैठक व्यवस्था, वॉटर प्रूफिंग, मंदिर संवर्धन, 64 योगिनी संवर्धन, शॉपिंग कॉम्प्लेक्स, स्वच्छतागृह, पार्किंग, हेरिटेज प्लाझा.
जोतिबा मंदिर : जोतिबा, यमाई मंदिरांचे संवर्धन, चाफेवन परिसर विकास, धार्मिक पर्यटनासाठी केदार विजय गार्डन उभारणी, पायवाटांचे जतन, कर्पूरेश्वर, चव्हाण व मुरलीधर तलावांचे संवर्धन, नवतळे परिसराचे सुशोभीकरण, ज्योतस्तंभ आदी.