

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकासाला अखेर मंगळवारी प्रारंभ झाला. अनेक वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यावर चर्चा होत असताना, या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामे सुरू करण्यात आली आहेत. कामे सुरू झाली असली, तरी महापालिका निवडणुकीसाठी लागू केलेली आचारसंहिता संपताच, तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या शुभारंभाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
अंबाबाई देवस्थान परिसर विकासाच्या आराखड्यातील 1,445 कोटी 97 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 143.90 कोटी रुपयांची अंबाबाई मंदिर संवर्धनाशी संबंधित कामे केली जाणार आहेत. त्यातील 34 कोटी 78 लाख रुपयांची कामे केवळ मंदिर परिसरात केली जाणार आहेत. या कामांना सुरुवात झाली आहे. जोतिबा देवस्थान विकासासाठी 259.59 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात मंदिर संवर्धनाशी संबधित 33 कोटी 90 लाख रुपयांच्या संवर्धनाच्या कामांनाही सुरुवात करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यातील दोन्ही मंदिरे जतन आणि संवर्धनाशी संबंधित कामे आहेत. यामुळे राज्य पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली ही सर्व कामे केली जाणार आहेत. याकरिता राज्य पुरातत्त्व विभागाच्या यादीवरील ठेकेदारांकडूनच निविदा मागवल्या होत्या. त्यापैकी ठेकेदार निश्चित केले असून, त्यांना वर्क ऑर्डरही (कार्यारंभ आदेश) देण्यात आले. त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याचे जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात होणार ही कामे
पहिल्या टप्प्यात दोन्ही मंदिर संवर्धनाशी संबंधित कामे केली जाणार आहेत. त्यानुसार मंदिराचे तुटलेले सर्व भाग नव्याने करणे, मंदिर परिसरातील सर्व रंग काढून त्यांचे मूळ नैसर्गिक स्वरूप पूर्ववत करणे. मंदिराचा जोथा मुजला आहे, तो पूर्ववत करणे, फरशांचा थर काढून नव्याने मूळ उंचीवर दगडी फरशी घालणे, शिखरावरील रंग काढून नव्याने झळाळी देणे, ओवऱ्यांची दुरुस्ती करणे, संपूर्ण वॉटर प्रूफिंग आणि ड्रेनेज लाईनचे काम यासह अंबाबाई मंदिरातील 64 योगिनी मूर्तीं पूर्ववत करणे.
आचारसंहिता संपल्यानंतर भव्य कार्यक्रम
तीर्थक्षेत्र विकासाला प्रारंभ झाला असला तरी त्याचा भव्य कार्यक्रम आचारसंहिता संपल्यानंतर केला जाणार आहे. याकरिता केंद्र सरकारमधील नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचेही नियोजन करण्यात येत आहे.