

कोल्हापूर : केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने संवर्धन प्रक्रियेसाठी तीन दिवसांपासून दर्शनासाठी बंद असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूळ मूर्ती गुरुवारपासून (दि. 14 ) दर्शनासाठी खुली करण्यात आली. संवर्धन प्रकियेंतर्गत केलेल्या स्वच्छतेमुळे मूर्तीचे सौंदर्य अधिक खुलले आहे. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या वतीने करण्यात आलेल्या संवर्धन प्रक्रियेच्या कारणास्तव सोमवारपासून (दि.11) श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. बुधवारपर्यंत (दि. 13) गाभारा बंद ठेवला होता. गुरुवारी पहाटेपासूनच मंदिरात देवीच्या मूर्तीत प्राणतत्त्व विलीन करण्याच्या धार्मिक विधींना प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजताच्या अभिषेकानंतर देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन सुरू झाले. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सकाळी 10 वाजता देवीचे दर्शन घेतले व मंदिर आवारात सुरू असलेल्या गरुड मंडप, नगारखाना व मणिकर्णिका कुंडाच्या कामाची पाहणी केली.