

कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकासाचा सुधारित पहिल्या टप्प्याचा आराखडा सोमवारी राज्य सरकारला सादर केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. या पहिल्या टप्प्याच्या आराखड्याला निधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यापूर्वी 1 हजार 445 कोटी 97 लाख रुपयांचा आराखडा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समितीसमोर सादर केला होता. यावेळी तो टप्प्याटप्प्याने राबवावा. पहिल्या टप्प्यात मंदिर संवर्धन, जतन आणि पायाभूत सुविधा आदींचा समावेश करा, अशा सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या.
पहिल्या टप्प्यात मंदिर परिसरातील संवर्धन, जतनसंबंधित कामे केली जाणार आहेत. यापूर्वीच्याही आराखड्यात या कामांचा समावेश होता. आता स्वतंत्रपणे मंदिर परिसरातील वॉटर प्रूफिंग, भूमिगत विद्युतवाहिन्या, भूमिगत सांडपाणी वाहिन्या यासह मंदिराच्या स्थापत्याशी संबंधित कामांचा समावेश होणार आहे.