

कोल्हापूर : श्रावण महिन्यातील शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्टीची पर्वणी साधत अंबाबाईच्या दर्शनासाठी पर्यटकांनी गर्दी केली. शनिवार व रविवारी दोन दिवसांत 1 लाख 4 हजार 219 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली. शनिवारी 37 हजार 67 तर रविवारी 67 हजार 152 भाविकांनी दर्शन घेतले.
पर्यटकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. तसेच शहर व जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना भेट देत श्रावणातील पर्यटनाचा आनंद लुटला. गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. श्रावण महिन्यात धार्मिक पर्यटनाला पसंती दिली जाते. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई दर्शनासाठी दरवर्षीच श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून गर्दी होते. सलग शनिवार आणि रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांनी शहरातील धार्मिकस्थळे व पर्यटनकेंद्रे फुलून गेली.
अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिर श्रावण सोमवारी खुले होणार आहे. तसेच जिल्ह्यातील कणेरी मठ, खिद्रापूर, सातेरी यांसह प्रसिद्ध महादेव मंदिरांच्या दर्शनासाठी पर्यटकांनी नियोजन केले आहे. त्यामुळे सोमवारीही पर्यटकांची गर्दी कायम असण्याची शक्यता आहे.