

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर आंबा घाटातील धोकादायक वळणे काढण्यासाठी साडेतीन किलोमीटरचा बोगदा खोदण्यात येणार आहे. या कामास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. खासगी ठेकेदारामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आंबा घाटाची सुधारणा व रुंदीकरणाच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या महामार्गावर आंबा येथे सात कि.मी.चा आंबा घाट आहे. या घाटात अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत.
त्यामुळे या परिसरात अपघात घडतात. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव पुढे आला. केंद्रीय मंत्रिमंडळांच्या बैठकीत आंबा घाट-बोथटवाडा पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नवी मुंबई येथील खासगी सल्लागार संस्थेला
सर्वेक्षणाचे काम दिले आहे. सर्वेक्षणानंतर बोगद्याचा लांबी, रुंदी आणि तांत्रिकदृष्ट्या आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यानंतर अंदाजपत्रक तयार करून मंजुरी घेण्यात येईल. त्यानंतरच खऱ्या अर्थाने बोगद्याचे काम सुरू होणार आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. याच महामार्गावर आंबा घाट हा सुमारे सात किलोमीटर लांबीचा असून, या घाटात अनेक ठिकाणी अतिशय धोकादायक आणि तीव्र वळणे आहेत. या वळणांमुळे घाटात अनेकदा अपघात होतात आणि वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यात तर या घाटातून प्रवास करणे मोठे जिकिरीचे ठरते.
या पार्श्वभूमीवर, घाटाची सुधारणा आणि रुंदीकरण करताना, ही धोकादायक वळणे कायमस्वरूपी वगळण्यासाठी बोगद्याचा पर्याय निवडण्यात आला आहे. साडेतीन किलोमीटरचा बोगदा तयार झाल्यास, घाटातील धोकादायक भाग पूर्णपणे टाळता येणार आहे आणि प्रवास अत्यंत सुरक्षित व जलद होणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
आंबा घाटाचा उतार, पश्चिम घाटातील कठीण डोंगररांगा, तसेच रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील भौगोलिक रचना लक्षात घेऊन हा रस्ता सुरक्षित व चारपदरी करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या घाटात ५०० मीटरपेक्षा अधिक खोल दऱ्या असून अनेक ठिकाणी घसरणीचा धोका आहे. पर्यायी सर्वेक्षण करून रस्त्याचे डिझाईन अंतिम करण्याचे आदेश दिले आहेत.
सुरक्षा व पर्यावरणाचा विचार
या प्रकल्पासाठी डिझाईन स्पीड प्रति तास ४० किमी ठेवण्यात आला आहे. तसेच ३०० मीटर, २०० मीटर आणि १०० मीटर लांबीचे बोगदे तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय घाटातील वन्य प्राणी, राष्ट्रीय उद्यान व जंगल परिसराचा पर्यावरणीय समतोल राखत रस्ता सुधारणा करण्यात येणार आहे.