

मुदाळतिट्टा; प्रा. शाम पाटील
'बाळूमामाच्या नावानं चांगभलं...'चा जयघोष आणि भंडाऱ्याच्या उधळणीत श्रीक्षेत्र आदमापुर (ता. भुदरगड) येथे दीपावली पाडव्या (दि. २) दिवशी बाळूमामाच्या बकरी पूजनाचा व भुजवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. बाळूमामांनी सुरू केलेल्या बकरी पूजन व बकरी बुजवणे या कार्यक्रमास महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातून हजारो भाविक उपस्थित होते. (Balumama Admapur)
बाळूमामा मंदिरातून देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते ढोल-कैताळच्या वाद्यात भंडारा आणण्यात आला. मरगुबाई मंदिर परिसरात बाळूमामांच्या बकऱ्यांची लेंढ्याची रास करण्यात आली. या राशीचे विधिवत पूजन करण्यात आले. विविध प्रकारच्या फुलांनी रास सजवण्यात आली होती. सभोवती गवळण्या घालण्यात आल्या होत्या. बाळूमामांच्या कळपातील प्रातिनिधिक स्वरूपात बुजवण्यासाठी (पळवणे) बकरी आणण्यात आली. सुवासिनींनी बकऱ्यांचे पूजन केले. बाळूमामांच्या भंडाऱ्याची राशीवर उधळण करण्यात आली. यावेळी दूध ऊतू जाण्याच्या कार्यक्रमाकडे सगळ्या भाविकांच्या नजरा लागून राहील्या होत्या. ही प्रथा बाळूमामानी सुरू केली होती. ज्या दिशेला हे दूध ऊतू जाईल त्या दिशेला पाऊस पिकपाणी उत्तम राहते, अशी भावना लोकांची आहे. यावर्षी पश्चिम बाजूला दूध ऊतू गेले. (Balumama Admapur)
विविध जाती-धर्मातील भक्ताने आणलेला दिवाळीचा फराळ यावेळी भक्तांना वाटप करण्यात आला. सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारा आदमापूरची दिवाळी पाडवा यात्रा उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास अध्यक्ष धैर्यशील राजेभोसले, कार्याध्यक्षा रागिणी खडके, सचिव संदीप मगदूम, भाकणूककार कृष्णात डोणे, नागाप्पा मिरजे, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंतराव पाटील, दिलीप पाटील, संभाजी पाटील, शामराव होडगे, विजयराव गुरव, इंद्रजीत खर्डेकर, राजनंदिनी भोसले, भिकाजी शिंणगारे आदी उपस्थित होते.