

कोल्हापूर : अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग गुरुवारी वाढवण्यात आला असून, धरणात येणार्या पाण्याची आवकही वाढली आहे. यामुळे सध्या धरणातून कृष्णा नदीपात्रात 1 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. विसर्ग वाढवण्यात आला असला, तरी धरणातील साठा 72 टक्के झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीतून कर्नाटकात जाणार्या पाण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अलमट्टीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी अलमट्टी धरणात 85,537 क्युसेक पाण्याची आवक होती, तर धरणातून 70 हजार क्युसेक पाणी पुढे सोडले जात होते. बुधवारी सकाळी आठ वाजता धरणाची पाणी पातळी 517.26 मीटरवर होती आणि धरणात 87.73 टीएमसी पाणीसाठा होता. गुरुवारी धरणातील पाण्याची आवक 93,963 क्युसेकपर्यंत वाढली.