

कोल्हापूर : 15 ऑगस्टपर्यंत 517.50 मीटरपर्यंत पाणी पातळी ठेवा, असे असताना अलमट्टी धरणाने ही ‘बॉर्डर लाईन’ सोमवारी ओलांडली. धरणाची पाणी पातळी 517.84 मीटरवर गेली असून, धरणात 95.47 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अलमट्टीची पाणी पातळी 517.50 मीटरवर गेली असली, तरी सध्या पावसाचा जोर कमी असल्याने तूर्त कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका नाही. मात्र, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला, तर धोका निर्माण होण्याचीही शक्यता आहे.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील पूरस्थिती गंभीर होऊ नये, याकरिता अलमट्टी धरणाची पाणी पातळी दि. 15 ऑगस्टपर्यंत 517.50 मीटरपर्यंत स्थिर ठेवावी, त्याद़ृष्टीने धरणातून पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करावे, असा निर्णय आंतरराज्य बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून त्याचे पालनही केले जात आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पावसाचा जोर पूर्णत: कमी झाला आहे. परिणामी, नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातील पाण्याची आवकही कमी झाली आहे. अलमट्टी धरणात गेल्या पाच दिवसांपूर्वी 1 लाख 1 हजार क्युसेक पाणी जात होते, दि. 14 जुलै रोजी हे प्रमाण 63 हजार क्युसेकवर आले आहे.
पावसाचा जोर कमी झाला असला, तरी अलमट्टीत पाणी वाढत असून, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे. दि. 15 ऑगस्टपर्यंत 517.50 मीटरपर्यंत ठेवावी लागणारी पाणी पातळी रविवारी रात्री ओलांडून पुढे गेली. धरणाची सोमवारी सकाळी सात वाजता पाणी पातळी 517.84 मीटर इतकी होती. धरणात सध्या 63 हजार क्युसेक पाणी येत असले, तरी धरणातून पुढे सोडल्या जाणार्या पाण्याचे प्रमाण कमी करून ते अवघ्या 20 हजार क्युसेकवर आणले आहे. यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.