कोल्हापूर, सांगलीला ‘जलबुडीचा’ धोका!

नदीकाठची गावे उद्ध्वस्त होण्याची भीती; वित्तहानीचा अंदाज लावणेसुद्धा कठीण
Kolhapur News
कोल्हापूर, सांगलीला ‘जलबुडीचा’ धोका!
Published on
Updated on
सुनील कदम

कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची आणखी पाच मीटरने वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची काय अवस्था होईल, याची कल्पनाच न केलेली बरी! अलमट्टीची उंची वाढविली आणि भविष्यात पुन्हा विनाशकारी महापूर आला, तर जवळपास निम्मे कोल्हापूर शहर आणि संपूर्ण सांगली शहर महापुराच्या पाण्यात बुडण्याचा धोका आहे. पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीकाठी असलेली छोटी-मोठी गावे तर बेचिराख झाल्याशिवाय राहणार नाहीत.

कल्पनाच भयावह!

2005, 2019, 2021 आणि 2024 साली आलेल्या प्रलयंकारी महापुराची झळ कोल्हापूर आणि सांगली शहराने चांगलीच अनुभवली आहे. या महापुरात कोल्हापूर शहराचा जवळपास सर्व उत्तर-पूर्व भाग पाण्याखाली गेला होता. अशावेळी अलमट्टी धरणाची उंची आणखी पाच मीटरने वाढल्यास महापुराची पाणी पातळीही आणखी 15 फुटांनी वाढली तर शहराची काय हालत होईल, याचा अंदाज येण्यास हरकत नाही. अशावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 18 ते 25 फूट पाणी असेल. जिल्हाधिकारी कार्यालय आणि व्हीनस कॉर्नरवर जर 18 ते 25 फूट पाणी येणार असेल, तर महापूर शहरातील कोणकोणत्या भागाला विळखा घालेल, याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर सर्रकन काटे येतील. कोल्हापुरातील सर्वाधिक उंचवट्यावर असलेला शहराचा काही भाग सोडला, तर निम्म्याहून अधिक कोल्हापूर बुडून गेलेले असेल.

सांगलीचे हाल

अलमट्टीची उंची वाढल्यास सांगली शहराची हालत तर कोल्हापूरपेक्षा भयावह होईल. अवघी 30 ते 35 फूट पाणी पातळी असताना बाधित होणार्‍या दत्तनगर, काकानगरची हालत पाणी पातळी 72 फूट झाल्यावर काय होईल? मध्यवर्ती बसस्थानकात मागच्या महापुराच्यावेळी चार ते पाच फूट पाणी होते. अलमट्टीची उंची वाढल्यानंतर बसस्थानकातील पाणी पातळी 23 ते 24 फूट झाली, तर शहरातील एक तरी नागरी वस्ती महापुराच्या तावडीतून सुटेल काय? महापूर पार मार्केट यार्डात घुसून पोलिस मुख्यालयाला आणि विश्रामबागलाही विळखा घालू शकेल. अशा परिस्थितीत सांगली शहराचे अस्तित्व तरी राहील काय?

नदीकाठच्या गावांचे काय?

पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीकाठी लहान-मोठी शेकडो गावे आहेत. अलमट्टीमुळे महापूर येऊ लागल्यापासून दरवर्षी ही गावे पुराने - महापुराने बाधित होताना दिसतात. अशावेळी जर अलमट्टीची उंची आणखी 17 फुटांनी वाढली, तर या गावांचे करायचे काय? भविष्यात या गावांचे अस्तित्व नकाशावरूनसुद्धा गायब होईल. त्याचप्रमाणे शेतीवाडी आणि नागरी मालमत्तांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान कोण आणि कसे भरून देणार, हा सवालच आहे.

(क्रमश:)

बुडत्या सांगली शहराची भविष्यातील एक झलक..!

2005, 2019 आणि 2021 साली कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या वेळी सांगलीतील आयर्विन पुलाजवळ सर्वोच्च पाणी पातळी 57.6 फूट इतकी होती. अलमट्टीची उंची वाढल्यावर महापूर आल्यास ही पाणी पातळी किमान 72 फूट होईल. त्या पार्श्वभूमीवर सांगली शहराच्या कोणत्या भागात किती फूट पाणी असेल, त्याची ही झलक...

  • कॉलेज कॉर्नर व आजूबाजूचा परिसर : 18 ते 19 फूट

  • गोकुळनगर ते मध्यवर्ती बसस्थानक : 23 ते 24 फूट

  • गुजराती हायस्कूल ते ईदगाह मैदान : 28 ते 29 फूट

  • सांगलीवाडी, टिळक चौक, शामरावनगर : 30 ते 31 फूट

  • रामनगर, आमराई, व्यंकटेशनगर : 31 ते 32 फूट

  • हरिपूर रोड, पाटणे प्लॉट, भारतनगर : 32 ते 33 फूट

  • मारुती चौक आणि गावभाग परिसर : 32 ते 33 फूट

  • सिद्धार्थनगर, राजीव गांधीनगर परिसर : 33 ते 34 फूट

  • दत्तनगर, काकानगर, मगरमच्छ कॉलनी : 40 ते 41 फूट

  • कर्नाळ रोड, सूर्यवंशी प्लॉट परिसर : 41 ते 43 फूट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news