kolhapur Municipal elections | मनपात महायुती म्हणूनच लढण्यावर घटक पक्ष ठाम
चंद्रशेखर माताडे
कोल्हापूर : सुरुवातीपासून स्वतंत्र लढण्याची घोषणा करणारे व आपलाच झेंडा महापालिकेवर फडकणार, आपलाच महापौर होणार, अशा घोषणा करणारे महायुतीतील घटक पक्ष महायुती करण्यासाठी तयार झाले आहेत. या पक्षांची शुक्रवारी जागावाटपाची बैठक होणार आहे. यात जागावाटपाचा मसुदा निश्चित केला जाणार आहे. सुरुवातीला जुन्या प्रभागात कोणाचे नगरसेवक होते, यावर प्राधान्याने विचार होईल. ज्या पक्षाचा मित्रपक्ष आहे, त्यांना त्या त्या पक्षाने आपल्या कोट्यातून जागा देण्याचे ठरले आहे. यानुसार जनसुराज्य शक्ती पक्षाला भाजपच्या कोट्यातून जागा मिळणार आहेत.
महायुती होणार की नाही, अशी साशंकता तयार करण्यात युतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनीच हातभार लावला होता. याच नेत्यांनी वारंवार प्रसंगी स्वबळावर अशा घोषणा देऊन आपल्या पक्षाकडे ताकदवान उमेदवार आणण्यासाठी व्यूहरचना केली. त्यानुसार ताकदवान उमेदवारांची फळी त्या त्या घटक पक्षांनी तयार केली असून, आता याच जोरावर जागावाटपावेळी जादा जागांची मागणी करता येणार आहे.
भाजपने 34 जागांची मागणी केली आहे, तर शिवसेनेनेही तेवढ्याच जागांची मागणी केली असून, 81 मध्ये भाजपला 33, शिवसेनेला 33 व राष्ट्रवादीला 11 जागा असे जागावाटप होण्याची शक्यता व्यक्त होताच राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला. त्याला कारणही तसेच आहे. विसर्जित महापालिकेत भाजपचे 13, ताराराणी आघाडीचे 19, राष्ट्रवादीचे 15 व शिवसेनेचे 4 सदस्य होते. चार सदस्यांच्या पक्षाला 33 जागा व 15 पक्ष असलेल्या पक्षाला 11 जागा हे सूत्र मान्य होणार नसल्याचे राष्ट्रवादीने ठणकावले. तर भाजपने जागांची मागणी करताना आपल्या मूळच्या 13 व महाडिक यांच्या ताराराणी आघाडीच्या 19 मिळून 34 जागांची मागणी केली आहे.
जागावाटपाची प्राथमिक चर्चा हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील व धनंजय महाडिक यांच्यात झाली. तेव्हा परगावी गेल्याने राजेश क्षीरसागर चर्चेत सहभागी नव्हते. नंतर मुश्रीफ व क्षीरसागर यांच्यात चर्चा झाली. यामध्ये जागावाटपाचा तिढा तयार करायचा नाही व एखाद्या दुसर्या जागेसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही, असे म्हणत महायुती म्हणूनच एकत्र लढण्यावर एकमत करण्यात आले. आपल्या मित्रपक्षांना आपल्या कोट्यातून जागा देण्याचेही ठरविण्यात आले. आता शुक्रवारी प्रत्यक्षात जागावाटपाची बोलणी होतील.

