Gokul cooperative controversy | कार्यकारी संचालकांकडून 33 लाख रुपये वसूल करा

तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांची गोकुळ प्रशासकांकडे मागणी
Gokul cooperative controversy |
Gokul cooperative controversy | कार्यकारी संचालकांकडून 33 लाख रुपये वसूल करा
Published on
Updated on

कोल्हापूर : गोकुळसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीसाठी केलेला खर्च हा गोकुळच्या पैशातून केल्याचा आरोप तक्रारदार प्रकाश बेलवाडे यांनी केला आहे. यासाठी आलेला सुमारे 33 लाख रुपये खर्च कार्यकारी संचालकांच्या वेतनातून वसूल करावा, अशी मागणी बेलवाडे यांनी प्रशासक मंडळाकडे केली आहे.

गोकुळ निवडणूक, संचालक मंडळ मुदतवाढसंदर्भात कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या निर्णयाला गोकुळमधील राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्यच्या संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही झाली. सुनावणीसाठी झालेला खर्च संबंधित संचालकांनी गोकुळच्या पैशातून केल्याचा आरोप बेलवाडे यांनी केला आहे. यासंदर्भात बेलवाडे यांनी गोकुळ प्रशासकांची भेट घेऊन खर्चाची रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे. तसेच महालक्ष्मी पशुखाद्य येथे होणारी खरेदी बाजारभावाप्रमाणे करावी, मागील काही दिवसांतील बदल्यांचे अवलोकन करावे, रामकृष्ण पाटील यांची कारकून ते सहायक सरव्यवस्थापकपदी झालेल्या बढतीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शाहूवाडीतील 50 दूध संस्थांची उद्या सुनावणी

दूध संस्था सुनावणी प्रक्रियेला मंगळवार (दि.12) पासून सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयात सुरुवात होत आहे. शाहूवाडी तालुक्यातील 132 दूध संस्थांची सुनावणी घेतली जाणार आहे. दररोज 50 संस्थांना सुनावणीसाठी बोलवले जाणार आहे. गोकुळ संलग्न अवसायन प्रक्रियेतील 1320 दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. अद्याप शाहूवाडी आणि भुदरगड तालुक्यातील सर्वच दूध संस्थांची सुनावणी बाकी आहे. त्यामुळे मंगळवारपासून प्रथम शाहूवाडी तालुक्यातील दूध संस्थांच्या सुनावणीला सुरुवात होईल. तालुक्यातील अवसायन प्रक्रियेतील दूध संस्थांना सहायक निबंधक कार्यालयाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. शाहूवाडीची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर भूदरगड तालुक्यातील दूध संस्थांना सुरुवात होणार आहे. यानंतर अन्य तालुक्यांतील प्रलंबित राहिलेल्या दूध संस्थांची सुनावणी घेतली जाणार आहे.

प्रशासकांना दिली चुकीची माहिती; अधिकार्‍याला नोटीस

गोकुळचे प्रशासक संजयकुमार सुद्रिक यांनी कायदेशीर बाबीसंदर्भात चुकीची माहिती देत दिशाभूल केल्याप्रकरणी लिगल विभागातील एका वरिष्ठ अधिकार्‍यास कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी नोटीस बजावली आहे. गोकुळ संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर गोकुळचा कारभार आता पाच सदस्यीय प्रशासक मंडळाच्या हातामध्ये गेला आहे. सातार्‍याचे जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक या मंडळाचे अध्यक्ष आहेत. प्रशासक मंडळाकडून सध्या गोकुळमधील दैनंदिन कामकाजाची विभागनिहाय माहिती घेतली जात आहे. शनिवारी (दि. 9) प्रशासक मंडळाने विभागप्रमुखांसोबत बैठक घेत माहिती घेतली. दरम्यान, गोकुळच्या कायदेशीर प्रकरणांबाबत प्रशासकांनी माहिती मागितली होती. संबंधित विभागाने याबाबत चुकीची माहिती दिल्याने विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यास प्रशासकांच्या सूचनेनुसार कार्यकारी संचालक गोडबोले यांनी नोटीस बजावली आहे.

दूध संस्था आज प्रशासकांना भेटणार

जिल्ह्यातील सुमारे शंभरहून अधिक दूध संस्थांचे प्रतिनिधी आज सोमवारी (दि.11) सकाळी 11 वाजता गोकुळ शिरगांव येथे प्रशासकांची भेट घेणार आहेत. दोन दिवसांपुर्वीच काही संस्थांनी प्रशासकांकडे मुंबई, पुणे येथील दूध पुरवठा व पॅकींगचा ठेका असणार्‍या कोल्हापूर आईस, गोकुळ मिल्क सप्लायर आणि गायत्री कोल्ड स्टोरेज या कंपन्याच्या व्यवहारांची माहिती मागितली होती. त्यानंतर आता गोकुळ सलग्न सुमारे शंभरहून अधिक संस्था आज पुन्हा प्रशासकांची भेट घेणार आहेत. या संस्थांकडूनही गोकुळ संदर्भात काही माहिती मागितली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news