

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत शासन केवळ आश्वासन देत असून, प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या सर्वपक्षीय कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणुकीपूर्वी हद्दवाढ झालीच पाहिजे, या मागणीसाठी गुरुवारी एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यावेळी हद्दवाढीबाबत शासनाने तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा समितीने दिला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय कृती समितीचा लढा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आ. राजेश क्षीरसागर यांची संयुक्त बैठक झाल्यानंतर प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले होते; पण अद्यापही हद्दवाढ झाली नसल्याने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, हद्दवाढीसाठी आमचा लढा सुरूच आहे; पण आता कार्यकर्त्यांची फसवणूक होत असल्याची भावना बळावली आहे. एक लोकप्रतिनिधी बैठक अधिकृत नसल्याचे सांगतात, तर दुसरे प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगतात. या गोंधळामुळे नक्की काय सुरू आहे, हेच समजत नाही. याचा जाब विचारण्यासाठी आम्ही लवकरच ना. हसन मुश्रीफ यांना घेराव घालणार आहोत.
बाबा इंदूलकर म्हणाले, महापालिका निवडणुकीपूर्वी हद्दवाढ होणे आवश्यक आहे. शासन महापालिकेच्या प्रभाग रचनेला मुदतवाढ देते; पण जिल्हा परिषदेच्या रचनेला देत नाही. यावरून शासनाचे वेळकाढूपणाचे धोरण स्पष्ट दिसते.
या आंदोलनात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, राजेश लाटकर, माजी उपमहापौर भूपाल शेटे, भाकपचे सरचिटणीस रघुनाथ कांबळे, दिलीप पवार, दिलीप देसाई, प्रतिज्ञा उत्तुरे, अशोक भंडारे, सुभाष देसाई, किशोर घाटगे, राजू जाधव, अॅड. प्रमोद दाभाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजी विक्रेते असोसिएशनने या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनाला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.